Titanic Actor Bernard Hill Dies at 79:  'टायटॅनिक' आणि 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' सारख्या ब्लॉकबस्टर आणि पुरस्कार विजेत्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडलेले अभिनेते बर्नार्ड हिल (Bernard Hill Dies) यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बर्नार्ड हिल यांच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्री आणि बर्नार्ड हिलची को-स्टार बार्बरा डिक्सन हिने ही माहिती दिली.


अभिनेत्री बार्बराने ट्वीट करत म्हटले की, बर्नार्ड हिल यांचे निधन झाल्याची माहिती  मी अत्यंत दुःखाने करत आहे. 1974 मध्ये विली रसेलच्या 'जॉन पॉल जॉर्ज रिंगो अँड बर्ट' या शोमध्ये आम्ही एकत्र काम केले होते. तो एक अप्रतिम अभिनेता होते. त्यांच्यासोबत काम करणे हे माझ्यासाठी एक प्रकारचा सन्मान होता. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.  






निधनाचे कारण अस्पष्ट


बर्नाड हिल यांच्या निधनाचे नेमकं कारण समजू शकले नाही. मात्र, बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार,  बर्नाड हिल यांचे निधन रविवारी सकाळी 5 मे रोजी झाले. 


बर्नार्ड हिल यांच्या निधनानंतर चाहत्यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. अनेक युजर्सने त्यांच्या अभिनय कौशल्याचे कौतुक करत आहेत. अनेकांनी त्यांना अभिनयातील बारकावे कसे अवगत होते, याबाबत नमूद केले आहे. 



कोणत्या चित्रपटात काम केले आहे?


बर्नार्ड यांनी केट विन्सलेट आणि लिओनार्डो डिकॅप्रिओच्या 1997 मध्ये आलेल्या 'टायटॅनिक' या ऑस्कर विजेत्या चित्रपटात कॅप्टन एडवर्ड स्मिथची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांचे आजही कौतुक होत आहे. 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' मध्ये त्यांनी  किंग थिओडेनची व्यक्तीरेखा साकारली होती..


टीव्ही शोमध्येही दिसले आहेत


बर्नार्डने अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे. 1983 च्या 'बॉईज फ्रॉम द ब्लॅकस्टफ' या शोसाठी त्यांना बाफ्टा पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांनी बीबीसी नाटक मालिका वुल्फ हॉल (2015) मध्येही अविस्मरणीय काम केले. याशिवाय तो 2008 मध्ये आलेल्या Valkyrie आणि 2002 च्या Scorpion King मध्ये टॉम क्रूझसोबत दिसला होता.