Entertainment News: बॉलिवूड स्टार रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ने बॉक्स ऑफिसवर असा विक्रम रचला ज्याची कल्पना चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा अशक्य वाटत होती. या स्पाय- ॲक्शन ब्लॉकबस्टरने देशांतर्गत आणि जागतिक पातळीवरील अनेक विक्रम मोडले. जगभरात 1800 कोटींहून अधिक कमाई करत भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक म्हणून नाव कमावलं. ‘धुरंधर 2’ ( Dhurandhar 2)  हा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. ‘बाहुबली 2’चा विक्रम मोडण्यासाठी या चित्रपटाला जवळपास 10 वर्षं लागली. मात्र येत्या काही वर्षांत प्रदर्शित होणारे अनेक बिग-बजेट चित्रपट ‘धुरंधर 2’च्या या ऐतिहासिक कमाईला आव्हान देऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. चला पाहूया असे पाच चित्रपट, जे पुढचा धुरंधर ठरू शकतात.

Continues below advertisement

1. रामायण पार्ट 1 (दिवाळी 2026)

सध्या भारतीय सिनेमात सर्वाधिक उत्सुकता असलेला चित्रपट म्हणजे ‘रामायण पार्ट 1’. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर  प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. भारतीय संस्कृतीतील सर्वात पूजनीय महाकाव्य मोठ्या पडद्यावर भव्य स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न मानला जातोय. प्रभू श्रीरारामाची कथा सर्व पिढ्या आणि प्रदेशांमध्ये लोकप्रिय असल्याने तसेच दमदार व्हिज्युअल इफेक्ट्स आणि प्रचंड बजेटमुळे हा चित्रपट जागतिक स्तरावर मोठा प्रभाव पाडू शकतो अशी चर्चा आहे.

2. वाराणसी (एप्रिल 2027)

आगामी चित्रपटांमध्ये ‘वाराणसी’ हा सर्वात मोठा वाइल्डकार्ड मानला जातोय. एस. एस. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटात महेश बाबू आणि प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. भारतीय सिनेमात क्वचितच पाहायला मिळेल एवढं भव्य स्वरूप या चित्रपटाचा असेल अशी चर्चा आहे. ‘बाहुबली’ आणि ‘RRR’सारख्या चित्रपटांनी राजामौलींनी बॉक्स ऑफिसची उंची सातत्याने वाढवली आहे. भारतीय पौराणिक कथांवर आधारित जागतिक स्तरावरील साहसी कथा आणि कलाकारांची लोकप्रियता यामुळे ‘वाराणसी’ला केवळ चित्रपट नव्हे तर जागतिक सिनेमॅटिक इव्हेंट म्हणून पाहिलं जात आहे.

Continues below advertisement

3. राका (2027)

साय-फाय ॲक्शनपट ‘राका’ या चित्रपटाने याआधीच मोठ्या आगामी चित्रपटांमध्ये स्थान मिळवलं आहे. ॲटली दिग्दर्शित आणि अल्लू अर्जुन अभिनीत हा चित्रपट भविष्यकालीन विश्वातील भव्य ॲक्शन आणि VFX वर आधारित आहे. ‘पुष्पा’ फ्रँचायझीनंतर अल्लू अर्जुनची लोकप्रियता शिखरावर असून, ॲटलीच्या कमर्शियल सिनेमाच्या शैलीमुळे या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. भारतीय सिनेमात साय-फाय प्रकार कमी प्रमाणात केले जातात.त्यामुळे हा चित्रपट जर यशस्वी झाला तर, ‘राका’ला वेगळी ओळख मिळू शकते.

4. रामायण पार्ट 2 (दिवाळी 2027)

‘रामायण पार्ट 1’ यशस्वी ठरला तर दुसरा भाग आणखी मोठ्या पातळीवर पोहोचू शकतो. आजवरचा इतिहास पाहिला तर, यशस्वी चित्रपटांच्या सिक्वेलला अधिक मोठं यश मिळतं. राम आणि रावण यांच्यातील युद्धासह रामायणातील क्लायमॅक्स भारतीय महाकाव्यातील सर्वाधिक लोकप्रिय भागांपैकी एक आहे. त्यामुळे ‘रामायण पार्ट 2’ भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या सिनेमॅटिक इव्हेंटपैकी एक ठरू शकतो.

5. कल्की पार्ट 2 (2027-2028)

‘कल्की 2898 AD’च्या 1000 कोटींहून अधिक कमाईनंतर त्याच्या सिक्वेलची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हासन पुन्हा एकदा या चित्रपटात दिसणार असून, दीपिका पदुकोणच्या जागी साई पल्लवीची एंट्री होणार असल्याची चर्चा आहे. फ्रँचायझीची लोकप्रियता आणि प्रेक्षकांची उत्सुकता यामुळे ‘कल्की पार्ट 2’ जागतिक बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करू शकतो.

‘धुरंधर 2’चा विक्रम मोडणं सोपं नसेल

‘धुरंधर 2’ला प्रेक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद, रिपीट ऑडियन्स, दमदार ओव्हरसीज परफॉर्मन्स आणि पॅन-इंडिया लोकप्रियतेचा प्रचंड फायदा झाला. मात्र ‘रामायण पार्ट 1’, ‘रामायण पार्ट 2’, ‘कल्की पार्ट 2’, ‘वाराणसी’ आणि ‘राका’ हे चित्रपट चित्रपटगृहातील अनुभव लक्षात घेऊन बनवले जात आहेत. या प्रत्येक चित्रपटाकडे मोठं बजेट, स्टार पॉवर आहे. शिवाय या चित्रपटांविषयी प्रेक्षकांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवू शकतात.