Prashant Damle On Natya Parishad Election : 'अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदे'च्या (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. यात अध्यक्षपदी प्रशांत दामले (Prashant Damle) यांची बहुमताने निवड झाली आहे. अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर 'आताचं सरकार हे ऐकणारे सरकार' अशी प्रतिक्रिया प्रशांत दामले यांनी दिली आहे. 


प्रशांत दामले म्हणाले, "आमची टीम चांगलं काम करणारी आहे. महाराष्ट्रातील सर्वच शाखा आता सक्षम होतील. नाट्य व्यवसायासंबंधित अडचणी काय आहेत, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आता त्या अडचणी सोडवण्यावर आमचा भर असेल. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या माध्यमातून एक मोठं व्यासपीठ आम्हाला मिळालं आहे. त्यामुळे ही पाच वर्ष आम्ही जोरदार काम करू". 


प्रशांत दामले पुढे म्हणाले की, "येत्या काही दिवसांत नाट्य परिषदेशी संबंधित असलेल्या शाखा कार्यरत होतील. मराठी नाटक भारतीय स्तरावर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. 100 वं नाट्य संमेलन अजेंड्यावर आहे. अध्यक्ष नसतानाही आम्ही याबद्दल सतर्क होतो. आता कॅनव्हास मोठा आहे. उदय सामंत ट्रस्टी आहेत तर शरद पवार तह्यात विश्वस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू. तर आशिष शेलार हे देखील आमचे मित्र आहेत. आता आम्ही पान उलटलं असून पुन्हा पान उकरुन काढणार नाही. आताचं सरकार हे ऐकणारे सरकार आहे".


प्रशांत दामले बहुमताने विजयी


प्रसाद कांबळी (Prasad Kambli) यांचे 'आपलं पॅनल' आणि प्रशांत दामले (Prashant Damle) यांचं 'रंगकर्मी समूह' या दोन गटांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. यात प्रसाद कांबळींना मागे टाकत प्रशांत दामले बहुमताने विजयी झाले आहेत. त्यांना त्यांना 60 पैकी 50 मतं पडली आहेत. 


प्रशांत दामले यांच्या विजयाचा जल्लोष


नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले विजयी झाल्यानंतर गुलाल उधळून त्यांची मिरवणूक काढण्यात आली आहे. रंगकर्मी नाटक समूह पॅनलने प्रशांत दामले यांच्या विजयाचा चांगलाच जल्लोष केला आहे. तर दुसरीकडे प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनलचा मात्र दारुण पराभव झाला. प्रशांत दामले विजयी झाल्यामुळे नाट्यविश्वात आनंदाचे वातावरण आहे. तसेच लवकरच 100 व्या नाट्यसंमेलनाची तारीख आणि ठिकाण जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


संबंधित बातम्या


Prashant Damle : निकाल लागला! अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले