मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तसा गेल्या मार्च महिन्यात पंतप्रधानांनी लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर सर्वच क्षेत्रात आर्थिक अडचण निर्माण झाली. त्याची झळ मनोरंजन क्षेत्रालाही बसली. विशेषत: नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्या रंगमंच कामगारांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला. हातावर पोट असलेल्या या रंगकर्मींनी काय करायचं असा प्रश्न उभा राहिला. त्यानंतर त्यांच्या मदतीसाठी अनेक कलाकार एकत्र आले. नाट्यपरिषदेने मदत देऊ केली. अनेक समाजसेवी संस्थांंनी किराणा देण्यापासून अर्थसाह्य देण्यापर्यंत मदत केली. पुढे अनलॉकिंग सुरू झालं. प्रयोग सुरू झाले. आणि सगळं सुरळीत होतं आहे असं वाटत असतानाच पुन्हा ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन लागला. 


आता लॉकडाऊन लागल्यानंतरची स्थिती वेगळी आहे. कारण, हा नाटकाशी संबंधित प्रत्येक घटक घरात बसून आहेच, पण त्याही पलिकडे कोरोनाचा संसर्ग हा या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर होतो आहे. असा संसर्ग झाला, तर रंगमंच कामगार, कलाकार गांगरून जातो. कारण, त्याला हवी असलेली सपोर्ट सिस्टिम इथे नाही. मुंबई आणि परिसरातल्या रंगकर्मींना कोरोना काळात ही सपोर्ट सिस्टिम मिळावी म्हणूनच काही रंगधर्मी एकत्र आले आहेत आणि त्यांनी थिएटर दोस्त ही संकल्पना पुढे आणली आहे. सुनिल शानभाग, अक्षय शिंपी, मंजिरी पुपाला, सपन सरद, कल्याणी मुळे आणि सौम्या त्रिपाठी, पूजा अशी मंडळी एकत्र आली आहेत आणि त्यांनी थिएटर दोस्त ही सपोर्ट सिस्टिम नुकतीच उभी करायचा वसा उचलला आहे. 


थिएटर दोस्तची पोस्टर्स व्हॉट्स एपवर व्हायरल झाली आहेत. थिएटर दोस्तच्या मुख्य पोस्टवरवर एकत्र राहू तर सशक्त राहू असं सांगण्यात आलं आहे. आर्थिक साह्य देऊ आम्ही तुम्हाला काही गोष्टी दोऊ शकतो, असं यात नमूद करण्यात आलं असून यात वैद्यकीय चाचण्या, डॉक्टरांची फी, औषधं, घरगुती वाणसामान, जेवणाचे डबे यांसाठी आर्थिक साह्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तर त्याचवेळी काही गोष्टी इतर रंगकर्मींनी उपलब्ध करून दिल्या तर त्याचं स्वागतच असणार आहे. याचीही माहीती यात दिली आहे. यामध्ये टेलि-डॉक्टर उपलब्ध करून देणं, गरजूंच्या घरी वाणसामान-जेवण पोहोचवणं, जेवण देऊ शकणाऱ्या लोकांशी संपर्क करून देणं, ज्येष्ठ नागरिकांसाठी तांत्रिक साह्य करू देता येणाऱ्या स्वयंसेवकांचंही यात स्वागत असणार आहे. 


या संपूर्ण योजनेबद्दल रंगकर्मींकडूनच मिळालेली माहीती अशी, कोरोना झालेल्या कलाकारांसाठी, रंगमंच कामगारांसाठी काहीच सपोर्ट सिस्टिम नाहीय. त्यातून काही मंडळी एकत्र आली आहेत आणि त्यांनी ही सिस्टिम उभी करायचं ठरवलं आहे. त्यानुसार कुणा रंगकर्मीला कोरोना झाला तर त्याला लागणारी औषधं पुरवणं.. औषधांसाठी निधी नसेल तर तो देणं, त्यांना लागणारा डबा त्याभागात जिथे मिळत असेल तिथून तो देणं.. औषधांची, डॉक्टरांची, कौन्सिलर्सची यादी करून जिथे कोव्हिड पेशंट असेल त्या भागातल्या डॉक्टरांचा संपर्क त्याला देणं..म्हणजे कोव्हिड पेशंटला जे लागतं ते त्याला उपलब्ध करून देण्यावर या मंडळींचा भर आहे. 


थिएटर दोस्तसाठी लागणारा निधीही रंगकर्मींंनीच देऊ केला आहे. मुंबई आणि परिसरातल्या अनेक नाटकवाल्यांनी या थिएटर दोस्तसाठी निधी दिला आहे. त्यातून हे काम होतं. गेल्या दीड आठवड्यापासून ही सिस्टिम उभी करण्याचं काम चालू झालं आहे. आज जवळपास 25 स्वयंसेवक तयार झाले आहेत. मुंबई आणि परिसरातल्या डॉक्टरांच्या, वॉर्डच्या , वॉर्ड ऑफिसर्सच्या याद्या.. डबे देणाऱ्यांच्या याद्या करण्याचं काम चालू आहे. याबद्दल या मंडळींंच्या काही प्रतिनिधींशी संपर्क साधला असता काही दिवसांनंतर याबद्दल सविस्तर बोलण्याविषयी आश्वस्त केलं गेलं. 


थिएटर दोस्तची मंडळी ही सिस्टिम भक्कम करण्याच्या मागे लागली असतानाच या उपक्रमाचं जोरदार स्वागत रंगधर्मींनी केलं आहे. नाटकवाल्यांमध्ये थिएटर दोस्तची पोस्टर्स व्हायरल झाली आहेत. मुंबई आणि उपनगरातल्या अनेक रंगकर्मींंनी थिएटर दोस्तचं कॅम्पेन व्हायरल केलं आहे. ज्या रंगकर्मींना गरज आहे त्यांच्यासाठी संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे. अर्थात ही केस योग्य आहे का याची पडताळणीही केली जाणार आहे. त्यानंतरच ही मदत होईल.