मुंबई : आजुबाजूला जे घडतं आहे ते सिनेमातून दाखवण्याची जुनी रीत आहे. बऱ्याचदा उलटा प्रवासही घडतो. आधी एखादी गोष्ट सिनेमात येते आणि मग त्यातून ती समाजमनावर बिंबते. त्याची नक्कल होते. अलिकडच्या काळात भवताली घडणाऱ्या गोष्टी सिनेमात येऊ लागल्या आहेत. याला वास्तवदर्शी सिनेमे म्हटलं जातं. अर्थात त्यात सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून स्वातंत्र्य घेतलं जातंच. त्यातून सिनेमाची निर्मिती होते. सध्या एका सिनेमाच्या पोस्टरने भल्याभल्यांचे डोळे फिरवले आहेत. अनेकांच्या 'चवी' बिघडवल्या आहेत. कारण या सिनेमाचं पोस्टरच 'डेंजरस' आहे.


डेंजरस हा राम गोपाल वर्मा यांचा चित्रपट आहे. त्याची घोषणा त्यांनी काही काळापुर्वीच केली होती. त्या सिनेमात काय असेल.. ते कशापद्धतीने दाखवलं जाणार आहे, याची कोणतीही वाच्यता रामगोपाल वर्मा यांनी केली नव्हती. पण अशा शांततेतच पहिलं पोस्टर इंडस्ट्रीमध्ये आलं आहे. हा सिनेमा आरजीव्ही वर्ल्ड थिएटर हे रामगोपाल वर्मानींच चालू केलेल्या ऑनलाईन ओटीटीवर येणार आहे. कोरोना व्हायरसच्या काळात त्यांनी आपल्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्यावर हा सिनेमा येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. हा भारतातला पहिला समलिंगी संबंधांभवती फिरणारा थ्रीलर चित्रपट असणार आहे, असं कळतं.


अप्सरा रानी आणि नैना गांगुली या दोन अभिनेत्री या सिनेमातून दिसणार आहेत. चित्रपट हा केवळ प्रौढांसाठी या विभागात असेल यात शंका नाही. पण ऑनलाईन व्यासपीठावर हा चित्रपट येत असल्याने याला अशा सर्टिफिकेटची गरज भासणारी नाही. यापूर्वी मिया माल्कोवाला घेऊन त्यांनी क्लायमॅक्स हा चित्रपट बनवला होता. आता या दोन अभिनेत्रींना घेऊन त्यांनी डेंजरस हा चित्रपट बनवला आहे. दोन मैत्रिणींच्या 'गहिऱ्या' प्रेमसंबंधांची ही गोष्ट असणार आहे. चित्रपट येण्याअगोदरच रामगोपाल वर्मा यांनी माहौल तापवायला सुरूवात केली आहे हे खरं.