The Odyssey First Review Out: ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolen) यांच्या 'द ओडिसी' (The Odyssey) सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर (World Premiere) सोमवारी लंडनमध्ये (London) पार पडला. सिनेमातील कलाकार (Movie Actors) आणि तंत्रज्ञांच्या टीमनं रेड कार्पेटवर फोटोसाठी मनसोक्त पोज दिल्या. तसेच अमेरिका आणि ब्रिटनमधील काही निवडक चित्रपट समीक्षकांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावलेली. यासोबतच, ख्रिस्तोफर नोलन यांच्या 'द ओडिसी'चे पहिले रिव्यू समोर आले आहेत. हा सिनेमा कसा आहे, हे जाणून घेऊयात सविस्तर...
'द ओडिसी'चा पहिला रिव्यू (The Odyssey First Review)
सोमवारी 'द ओडिसी' पाहणाऱ्या अनेक समीक्षकांनी सोशल मीडियावर आपली प्राथमिक मतं मांडली असून, त्यांनी या सिनेमाला एक 'मास्टरपीस' आणि नोलन यांची सर्वात मोठी कामगिरी असल्याचं म्हटलं आहे. 'कोलायडर'चे (Collider) स्टीव्हन वेनट्रॉब यांनी ट्विटरवर लिहिलंय की, "ख्रिस्तोफर नोलन यांचा 'द ओडिसी' हा सिनेमा जबरदस्त आहे, मी या सिनेमानं खरोखरंच प्रभावित झालोय. उत्कृष्ट अभिनयापासून ते नोलन यांनी सुपरनॅचरल घटकांचं केलेलं चित्रण, प्रत्येक गोष्ट अगदी अचूक आणि प्रभावी आहे..."
ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आणि होस्ट पेरी नेमिऑफ यांनी टिप्पणी केलीय की, "द ओडिसी' हा सिनेमा निर्मितीचा एक दमदार अनुभव आहे. होमरच्या महाकाव्याचं हे एक भव्य आणि खिळवून ठेवणारं रूपांतरण आहे, ज्यामध्ये ख्रिस्तोफर नोलन यांच्या सिनेमाची स्पष्ट छाप जाणवते. खरं सांगायचं तर, मूळ साहित्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर, व्यापकतेनं आणि भावपूर्णतेने पडद्यावर आणण्याची कल्पना दुसऱ्या कोणत्याही चित्रपट निर्मात्याबाबत करणं कठीण आहे..."
मूळ कथेइतकेच भव्य (Christopher Nolen Upcoming Film The Odyssey)
अनेक समीक्षकांनी नोलनचं कौतुक केलं आहे. त्यांनी नमूद केलंय की, नोलननं केवळ मूळ कथेची भव्यताच टिपली नाही, तर तिला पूर्ण न्यायही दिलाय. चित्रपट पत्रकार रॅचेल लिशमन म्हणाल्या की, "द ओडिसी' (The Odyssey) ही फिल्म मूळ कथेइतकीच भव्य आहे आणि यात ख्रिस्तोफर नोलनची वैशिष्ट्यपूर्ण शैली दिसून येते, जी या चित्रपटाला वेगळं ठरवते. ही प्रेम आणि हानी यांची अशी एक कथा आहे, जी तुम्हाला अशा प्रवासावर घेऊन जाते, जो केवळ नोलनच साकारू शकतात. हा चित्रपट नेत्रदीपक, धाडसी आणि अत्यंत उत्कृष्ट आहे..."
दरम्यान, 'फँडँगो'चे (Fandango) एरिक डेव्हिस यांनीही या मतांशी सहमती दर्शवली आणि विशेषतः रॉबर्ट पॅटिन्सनच्या अभिनयाचं कौतुक केलंय. त्यांनी लिहिलंय की, "कलाकारांची फळी जबरदस्त आहे आणि तरीही प्रत्येकाला आपली छाप पाडण्याची संधी मिळते. ॲन हॅथवे अप्रतिम आहे, मॅट डॅमन उत्कृष्ट आहे आणि टॉम हॉलंडनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय की, तो कोणतीही भूमिका साकारू शकतो. पण माझ्या मते, रॉबर्ट पॅटिन्सननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. धूर्त, चलाख आणि प्रत्येक वळणावर वेधक वाटणाऱ्या पात्राची भूमिका करताना त्याला पाहणं हा एक आनंददायी अनुभव आहे. पॅटिन्सननं या पात्रातील खलनायकीपणा पूर्णपणे आत्मसात केली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे, त्याच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम अभिनयांपैकी एक कामगिरी पाहायला मिळाली आहे..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
