The Kerala Story 2 Controversy: ‘द केरळ स्टोरी 2’ कचाट्यात! केरळशी एकही पीडितेचा संबंध नाही?; पत्रकार परिषदेत मेकर्स गोत्यात, दिल्लीत नेमकं घडलं काय?
चित्रपटाचं नाव ‘केरळ स्टोरी’ असताना पीडितांमध्ये केरळमधील एकही महिला का नाही?” या प्रश्नावर वातावरण अधिकच तापले.

The Kerala Story 2: निर्माते विपुल अमृतलाल शहा यांच्या 'द केरला स्टोरी टू गोज बियॉन्ड ' या चित्रपटाभोवती रिलीजपूर्वीच मोठा वाद निर्माण झाला आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेत चित्रपटाच्या टीम आणि माध्यमांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. चित्रपटामुळे केरळची प्रतिमा डागाळली जात असल्याचा आरोप उपस्थित करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून केरला स्टोरी 2 हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटावर सर्व स्तरांमधून टीका होत आहे. मनोरंजन सृष्टीतील दिग्गज अभिनेते निर्माते दिग्दर्शक या चित्रपटाला प्रपोगंडा फिल्म असल्याचे म्हणत आहेत. दरम्यान सेन्सर बोर्डाने अखेर 16 बदल सुचवत या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र प्रदर्शनापूर्वी दिल्लीत झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मेकर्स पत्रकारांच्या कचाट्यात सापडले होते.
केरळचा संबंध नसल्याचा मुद्दा चर्चेत
प्रमोशनल कार्यक्रमात मेकर्सनी जबरदस्ती धर्मांतर झाल्याचा दावा केलेल्या सुमारे 30 महिलांना मंचावर आणले. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार त्या महिलांपैकी एकीचाही केरळशी संबंध नसल्याचा दावा केला जात आहे. या महिला बंगाल, बिहार, राजस्थान, महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, इंदूर आदी राज्यांतील असल्याचे सांगितले जात आहे. यावरून पत्रकारांनी थेट सवाल उपस्थित केला. “चित्रपटाचं नाव ‘केरळ स्टोरी’ असताना पीडितांमध्ये केरळमधील एकही महिला का नाही?” या प्रश्नावर वातावरण अधिकच तापले.
मेकर्सचा बचाव
या आरोपांवर उत्तर देताना विपुल शाह यांनी सांगितले की, पहिल्या भागातील संबंधित लोकांचे व्हिडिओ आधीच सार्वजनिक आहेत. “आज आम्ही त्यांनाच पुन्हा आणलं असतं, तर तुम्ही त्यावरही प्रश्न विचारले असते,” असे ते म्हणाले.
दिग्दर्शक कामाक्ष्या नारायण सिंग यांनीही भूमिका स्पष्ट करत म्हटले की, ही समस्या केवळ केरळपुरती मर्यादित नसून देशभरात विविध ठिकाणी दिसते. त्यामुळे व्यापक संदर्भ मांडण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
Propaganda movie 'The Kerala Story 2' Producer Vipul Shah and director introduced 30 women whom they claimed had allegedly experienced forced religious conversions. The women were from Bengal, Bihar, Rajasthan, Udaipur, Jammu, Maharashtra, Bhopal, Jharkhand, Faridabad, Meerut,… pic.twitter.com/KRCOOV2C2k
— Mohammed Zubair (@zoo_bear) February 25, 2026
‘प्रोपगंडा’च्या आरोपांवर मौन
चित्रपटाला काही जणांनी ‘प्रोपगंडा मूव्ही’ असेही म्हटले आहे. विशेषतः अनुराग कश्यप आणि प्रकाश राज यांच्या टीकेबाबत विचारले असता मेकर्सनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले. दरम्यान, चित्रपटाविरोधात केरळ हायकोर्टात याचिका दाखल झाल्याची माहिती आहे. ट्रेलर आणि टीझरमधून राज्याची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
27 फेब्रुवारीला होणार रिलीज
वाद वाढत असतानाही मेकर्सनी स्पष्ट केले की, त्यांचा उद्देश कोणत्याही राज्याला लक्ष्य करणे नसून राष्ट्रीय स्तरावरील मुद्दा मांडणे हा आहे. ‘द केरळ स्टोरी 2’ हा चित्रपट 27 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
























