The Accidental Cockroach Party Film On CJP Protest: नीट (NEET) पेपरफुटी आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यासाठी 'कॉकरोच जनता पार्टी'नं (Cockroach Janta Party) एल्गार पुकारत दिल्लीतील (Delhi) जंतर-मंतरवर (Jantar Mantar) आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनाचे पडसाद अख्ख्या देशभरात उमटले. तसेच, देशभरातून तरुण दिल्लीतील जंतर-मंतरवर पोहोचले होते. 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) अनोख्या आंदोलनानं संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेलं. आता या संपूर्ण राजकीय घटनाक्रमाला आणि पडद्यामागच्या घडामोडींना मोठ्या पडद्यावर आणण्याची तयारी सुरू झाली आहे. या आंदोलनावर आधारित एका भव्य सिनेमाची निर्मिती केली जात असून, या सिनेमाचं अधिकृत नाव 'द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी' (The Accidental Cockroach Party) असं निश्चित करण्यात आलं आहे.
जयपूरचे रहिवासी असलेल्या गोविंद देव ब्रह्म यांनी रिसर्च आणि स्क्रिप्टवर काम केल्यानंतरच या फिल्मची अधिकृत घोषणा केली. मीडिया रिपोर्टनुसार, हा सिनेमा या आंदोलनाशी संबंधित अशा अनेक धक्कादायक आणि पडद्यामागील गोष्टी उघड करेल, ज्या यापूर्वी लोकांपासून लपलेल्या होत्या.
आंदोलनापासून पडद्यामागच्या घडामोडींपर्यंत... (Movie On Cockroach Janta Party Protest)
नीट (NEET) परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणानंतर, दिल्लीतील जंतर-मंतर इथे 'कॉकरोच जनता पार्टी'नं केलेल्या आंदोलनानं शिक्षण व्यवस्था आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिलेली. याच आंदोलनाच्या दबावामुळे अखेरीस केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता. या सिनेमाशी संबंधित व्यक्तींच्या मते, हा केवळ एक राजकीय कथापट नसेल, तर या आंदोलनाचे आजवर समोर न आलेले पैलू, जसे की हे आंदोलन कसं आखलं गेलं आणि त्यामागे पडद्यामागून कोणत्या हालचाली झाल्या, हे प्रेक्षकांसमोर आणण्याचा उद्देश यात आहे.
सिनेमाच्या घोषणेपासूनच त्याच्या टायटलबाबत बरीच चर्चा होत आहे. निर्मात्यांनी या प्रकल्पासाठी 'द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी' (The Accidental Cockroach Party) हे शीर्षक अधिकृतपणे नोंदवलं आहे. हे शीर्षक केवळ वेगळंच नाही, तर त्या काळातील राजकीय घडामोडींवर केलेलं एक थेट आणि मार्मिक भाष्य आहे.
20 कोटींचं बजेट आणि स्टार कास्टही ठरली... (The Accidental Cockroach Party Movie Budget)
'द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी' हा छोट्या बजेटचा डॉक्यु ड्रामा नाहीतर, मोठ्या प्रमाणावर बनणारी फिचर फिल्म आहे. प्रोजेक्टशी निगडीत माहितीनुसार, फिल्मचं एकूण बजेट 20 कोटी रुपयांहून जास्त आहे. सध्या जयपूरच्या गोविंद देव ब्रह्म यांच्या देखरेखीत फिल्मच्या स्क्रिप्टवर काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. शुटिंग लोकेशनसुद्धा ठरवण्यावर वेगानं हालचाली सुरू आहेत. अशातच या सिनेमात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची भूमिका कोण साकारणार? याची चर्चा सुरू आहे.
केव्हा रिलीज होणार फिल्म? (The Accidental Cockroach Party Movie Released Date)
फिल्मची स्टार कास्ट आणि क्रूबाबत पडद्यामागे बरीच चर्चा रंगली आहे. मुख्य कलाकार, दिग्दर्शक आणि सह-निर्मात्यांची निवड करण्यासाठी मुंबईतील बड्या बॉलिवूड सिनेनिर्मात्यांशी सुरू असलेल्या वाटाघाटी आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सर्व काही योजनेनुसार घडल्यास, हा जबरदस्त सिनेमा 2027 मध्ये प्रदर्शित होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
