Tharala Tar Mag Marathi Serial Track: काही क्षण हे केवळ कथानकाला वळण देणारे नसतात, तर ते प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून जातात. 'ठरलं तर मग'मध्येही (Tharala Tar Mag) असा एक अविस्मरणीय क्षण आता साकार होणार आहे. गेली साडेतीन वर्ष ज्या सत्याची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते, ते अखेर समोर येणार आहे. सायली हीच तन्वी असल्याचं सर्वात मोठं रहस्य उलगडणार असून, तिच्या आयुष्यातील हा भावनिक क्षण प्रत्येकालाच भारावून टाकणारा आहे.
आतापर्यंत अनेक संकटांना सामोरी गेलेली सायली अखेर स्वतःची हरवलेली ओळख परत मिळवणार आहे. तिच्या आयुष्यातील या नव्या पर्वाची सुरुवात एका हृदयस्पर्शी गीतानं होणार आहे.
कधी होतेस तू मर्दिनी, कधी हाती फुले तुझ्या
कधी डोळ्यात ठिणगी, कधी चांदणी, कधी दामिनी
प्रत्येक रूपात तू नवी, बदलून सारी नाती
झालीस सायलीची तन्वी... असे गाण्याचे शब्द आहेत.
सुप्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांनी लिहिलेल्या आणि निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीतांचं सुभाष नकाशे यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. या गाण्यातून सायलीच्या प्रवासातील प्रत्येक भाव, प्रत्येक संघर्ष आणि तिच्या नव्या जन्माचा आनंद व्यक्त करण्यात आला आहे. सायलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी स्टार प्रवाह परिवारातल्या नायिकाही खास हजेरी लावणार आहेत.
या विशेष प्रसंगाविषयी अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली, "सायलीच तन्वी असण्याचा प्रसंग इतक्या सुंदर पद्धतीनं साकारलाय की, शूटिंग करतानाही अनेकदा डोळे पाणावलेत. प्रेक्षक सायलीवर मनापासून प्रेम करतात. सायली आजारी पडली की, तिच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. हे पाहून कायम भारावून जायला होतं. एका कलाकाराला यापेक्षा मोठं बक्षीस असूच शकत नाही. हा क्षण प्रेक्षकांनाही तितकाच भावेल, याची मला खात्री आहे..."
सायलीला 8 जुलैला सरप्राइज मिळणार?
सायलीची भूमिका या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी साकारतेय. तुम्हाला माहितीये का? जुईचं खऱ्या आयुष्यात 8 जुलै या तारखेशी खास कनेक्शन आहे. जुईचा वाढदिवस सुद्धा 8 जुलैलाच असतो आणि 'ठरलं तर मग'च्या विशेष भागाचं प्रसारण सुद्धा 8 जुलैलाच करण्यात येणार आहे. त्यामुळे पडद्यावर भूमिका साकारणारी सायली आणि खऱ्या आयुष्यात जुई... या दोघींसाठी हा दिवस खास असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
