Thalapathi Vijay: तामिळ सुपरस्टार थलपथी विजय गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे तो त्याच्या घटस्फोटामुळे आणि नवीन नात्यामुळे. एकीकडे त्याचा आगामी चित्रपट जननायकनच्या प्रदर्शनावर टांगती तलवार आहे. तर दुसरीकडे विजयच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय. एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा तर दुसरीकडे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केलाय. ती एका लग्नात विजय थलपतीसोबत दिसल्याने चर्चांना उधाण आलं. या सगळ्या चर्चांमध्ये विजय थलपतीचा मुलगा जेसन संजय सध्या चर्चेत आला आहे. जेसन संजय लवकरच सिग्मा या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. मात्र, चित्रपटाच्या क्रेडिट्समुळे सोशल मीडियावर नवी चर्चा रंगली आहे. रिपोर्ट्सनुसार, जेसनने या चित्रपटात वडिलांचं आडनाव न वापरता आईच्या नावाचं अक्षर वापरल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने त्याच्या सुपरस्टार वडिलांना instagram वर अनफोलो केलं होतं.
आईचं आडनाव वापरल्याची चर्चा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेसन संजयने ‘सिग्मा’ चित्रपटाच्या क्रेडिट्समध्ये आपलं नाव 'Jason Sanjay S.” असं देण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. इथलं “S” हे त्यांच्या वडिलांच्या नावाऐवजी आई संगीता सोर्नालिंगम यांच्या नावाचं पहिलं अक्षर असल्याची चर्चा आहे. या बाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी सोशल मीडियावर यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. काही रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं जात आहे की जेसन संजयने इंस्टाग्रामवरून वडील विजय यांना अनफॉलो केलं आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
विजय-संगीता यांच्या नात्यावरही चर्चा
थलपती विजय आणि संगीता सोरनालिंगम यांचं लग्न 25 ऑगस्ट 1999 रोजी झालं होतं. या दांपत्याला जेसन संजय आणि दिव्या - साशा अशी दोन मुलं आहेत. लग्नाला जवळपास 27 वर्षे झाल्यानंतर अलीकडेच दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा समोर आल्या. असा दावा करण्यात आला आहे की संगीता यांनी याचिका दाखल करत विजय यांच्यावर एका अभिनेत्रीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. या कथित प्रकरणामुळे त्यांना भावनिक त्रास झाल्याचंही म्हटलं जात आहे. दरम्यान, विजय यांचं नाव अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्यासोबतही जोडलं जात असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.
‘सिग्मा’मधून दिग्दर्शनात पदार्पण
जेसन संजय ‘सिग्मा’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट Action- Adventure कॉमेडी प्रकारातील असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटाची कथा स्वतः जेसनने लिहिली असून त्याची निर्मिती Lyca Productions करत आहे. तर चित्रपटाचं संगीत थामन एस यांनी दिलं आहे. दरम्यान, चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर जेसन संजयच्या दिग्दर्शकीय पदार्पणाबरोबरच त्यांच्या नावातील बदलाच्या चर्चेमुळेही सोशल मीडियावर मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
