Zee Marathi New Serial Paro and Shiva :  छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिका सुरू होत आहेत. टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मराठी वाहिन्यांकडून  वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. त्यातूनच काही  नव्या मालिका सुरू करण्यात आल्या आहेत. 'झी मराठी'ने (Zee Marathi) 12 फेब्रुवारी रोजी दोन नव्या मालिका सुरू करण्याची घोषणा केली. या दोन नव्या मालिकांची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली होती. मात्र, पहिल्याच दिवशी 'झी मराठी'कडून चूक झाली. त्यावर प्रेक्षकांनी थट्टा करत झी मराठीला प्रश्नही विचारले.


'झी मराठी'वर 'पारो' (Paro Serial)आणि 'शिवा' (Shiva) या दोन नव्या मालिका सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार सायंकाळी 7.30 वाजता 'पारो' ही मालिका प्रसारीत झाली. 'पारो'च्या पहिल्या एपिसोडला प्रेक्षकांनी दाद दिली. शिस्तबद्ध, करारी स्वभावाच्या अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्या घरात अल्लड, निरागस आणि बिंदास्त स्वभावाच्या पारोची एन्ट्री झाली आहे. त्यातून आता पुढे कथानक फुलणार आहे. 


'पारो' आली पण 'शिवा' नाही आली...


या नव्या मालिकेच्या पहिल्या  एपिसोडनंतर प्रेक्षकांना दुसऱ्या मालिकेची प्रतिक्षा होती. 'शिवा' ही दुसरी मालिका रात्री 9 वाजता प्रसारीत होणार होती. अनेकांना या मालिकेची उत्सुकता होती.मात्र, या मालिकेची प्रतिक्षा असणाऱ्या प्रेक्षकांचा चांगलाच हिरमोड झाला. रात्री 9 वाजता  'शिवा' ऐवजी 'पारो' या मालिकेचाच एपिसोड पुन्हा प्रक्षेपित झाला. 






'झी मराठी'कडून झालेल्या या ब्लंडरवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने शिवा मालिका 9 वाजता येणार होती.मात्र, 9 वाजता पुन्हा पारो सीरियल रिपीट केली. झी मराठीवाले पागल आहेत का असा सवाल या प्रेक्षकाने केला. तर, एका प्रेक्षकाने शिवा सीरियलबद्दल झी मराठीवाले विसरले वाटतं असे म्हटले. 








'या' अभिनेत्याचं कमबॅक


काही वर्षांपूर्वी झी मराठीवर आलेल्या 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ओम म्हणजेच अभिनेता शाल्व खिंजवडेकर या 'शिवा' या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच शिवा भूमिकेतच अभिनेत्री पूर्वा फडके ही मुख्य भूमिकेत दिसरणार आहे. 


ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर (Pradeep Velankar) यांची दुसरी कन्या आणि अभिनेत्री मधुरा वेलणकरची (Madhura Velankar) बहिण मीरा वेलणकर (Meera Velankar) ही देखील आता छोट्या पडद्यावर दिसणार आहे. मीरा वेलणकर ही झी मराठीवरील 'शिवा' या नव्या मालिकेत झळकणार आहे. 'शिवा' मध्ये मीराची महत्त्वाची भूमिका आहे. मीरा वेलणकर या मालिकेतील मुख्य व्यक्तीरेखा असलेल्या आशूची आई सीताईची व्यक्तिरेखा साकारणार आहे.