Vaishali Thakkar : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) हिने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या लाडक्या अभिनेत्रीच्या जाण्याने तिचे चाहतेही दु:खी आहेत. तिच्या मृत्यूनंतर अनेक गुपिते उघड होत आहेत. तिचा माजी प्रियकर राहुल नवलानीच्या छळाला कंटाळून वैशालीने हे पाऊल उचलल्याचे वैशालीच्या सुसाईड नोटवरून उघड झाले आहे. वैशाली ठक्कर प्रकरणानंतर इंदूर पोलीसही सक्रिय झाले आहेत. वैशालीचा प्रियकर राहुल नवलानी, त्याची पत्नी दिशा आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलिस लुकआउट नोटीस जारी करणार आहेत.
वैशाली ठक्करच्या आईने आपल्या मुलीला न्याय देण्याची मागणी केली आहे. वैशालीने इंदूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये तिने राहूल नवलानी आणि पत्नी दिशा यांच्यावर आरोप केले आहेत. आता वैशालीची आई अनु कौर ठक्कर यांनी राहुलवर आरोप केला आहे की, त्याच्यामुळेच वैशालीने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी राहुल आणि त्याच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या राहुल फरार आहे.
वैशालीने आईला सांगितलेली आपबिती
वैशालीची आई म्हणाली की, तिच्या मुलीने आधी सर्व काही स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न केला. नंतर तिने अडीच वर्षांपासून राहुल आपल्याला त्रास देत असल्याचे सांगितले. वैशाली तिच्या आईला म्हणाली होती की, ‘आई, तो गेल्या अडीच वर्षांपासून माझा छळ करत आहे. तू हार्ट पेशंट आहेस, त्यामुळे मला हे सांगायचे नव्हते. मला वाटले होते, मी हे सर्व हाताळेन, पण आता मी थकले आहे आणि आता तूच ही समस्या सोडव.’
राहुलने केली फसवणूक!
वैशाली ठक्करची आई अन्नू कौर ठक्कर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पहिल्या लॉकडाऊननंतर वैशाली जेव्हा मुंबईहून इंदूरला आली, तेव्हा तिची भेट राहुल नवलानीशी झाली आणि त्यानंतर दोघांची मैत्री वाढली. राहुल आधीच विवाहित असून, त्याला दोन मुले आहेत. मी माझ्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करेन, असे त्याने वैशालीला सांगितले होते. मात्र, राहुल आपल्या पत्नीला घटस्फोट देणार नाही, असे वैशालीला वाटल्याने तिने त्याच्यापासून स्वतःला दूर केले आणि मग वैशालीने दुसऱ्या मुलासोबत साखरपुडा केला. यानंतर राहुलने वैशालीला त्रास देण्यास सुरुवात केली.
नंतर वैशालीने याबद्दल घरी कल्पना दिली. घरच्यांनी देखील राहुलला फोन करून समजावले. पण, त्याने काहीही समजून घेतले नाही आणि त्याची पत्नी दिशा हिनेही वैशालीचे आयुष्य बरबाद करणार असल्याची धमकी दिली होती, जी तिने पूर्ण केली आहे. वैशालीने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या आईला सांगितले होते की, राहुल हा ‘डर’ चित्रपटातील शाहरुख खानच्या पात्रासारखा आहे. राहुल बाहेरून जितका चांगला वाटतो, तितकाच तो आतून अतिशय धोकादायक आहे.
संबंधित बातम्या