आक्षेपार्ह संवादामुळे 'तुझ्यात जीव..' विरोधात शिक्षक संघटना आक्रमक
एबीपी माझा वेब टीम | 26 Jan 2018 03:16 PM (IST)
शिक्षकांबाबत वापरले गेलेले शब्द आणि विद्यार्थिनीबरोबर दाखवण्यात आलेलं प्रेमप्रकरण यामुळे राज्यातील शिक्षक संघटना दुखावल्या आहेत.
मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' ही झी मराठी वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे, मात्र त्यामागील वादांची मालिका काही केल्या संपताना दिसत नाही. शिक्षकांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत आता शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शिक्षकांबाबत वापरले गेलेले शब्द आणि विद्यार्थिनीबरोबर दाखवण्यात आलेलं प्रेमप्रकरण यामुळे राज्यातील शिक्षक संघटना दुखावल्या आहेत. सोशल मीडियावर शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मालिकेमुळे शिक्षकांची प्रतिमा मलिन होत असल्याची पोस्ट शिक्षकांच्या ग्रुपमध्ये फिरत आहे. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत खलनायिकेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नंदिता वहिनीच्या तोंडी शिक्षकांविषयी आक्षेपार्ह शब्द असल्याचा आरोप आहे. मास्तरडे, मास्तरीन, मास्तुरड्या, दीमदमडीचे मास्तरडे अशा शब्दांमुळे शिक्षकांचा अवमान होत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत अक्षया देवधर ही अंजली पाठक या शिक्षिकेची व्यक्तिरेखा साकारते. तर अभिनेता हार्दिक जोशी हा राणा दा या पैलवानाच्या भूमिकेत आहे.