Sukh Mhanje Nakki Kay Asta Marathi Serial Latest Update : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकरची (Harshada Khanvilkar) धमाकेदार एन्ट्री होणार आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मध्ये जयदीप-गौरीच्या प्रेमकहाणीचा नवा अध्याय सुरु होणार आहे. मालिकेचं कथानक 25 वर्षांनी पुढे सरकलं असून गौरी-जयदीच्या पुनर्जन्माची उत्कंठावर्धक गोष्ट नित्या आणि अधिराजच्या रुपात पाहायला मिळणार आहे. या नव्या पर्वात नित्या-अभिराजची प्रेमकहाणी कशी फुलणार? कोणती नवी पात्र असणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हर्षदा खानविलकर मालिकेत साकारणार सरपंच वसुंधरादेवी अहिरराव
अभिनेत्री हर्षदा खानविलकरची 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत धमाकेदार एण्ट्री होणार आहे. हर्षदाताई मालिकेत सरपंचाच्या भूमिकेत दिसणार आहे. सौ. वसुंधरादेवी अहिरराव असं तिच्या भूमिकेचं नाव असून आतापर्यंत त्यांनी साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आणि हटके अशी ही भूमिका असेल.
हर्षदा खानविलकर आपल्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाल्या,"सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत मी साकारत असलेली वसुंधरादेवी ही व्यक्तिरेखा खूपच वेगळी आहे. आतापर्यंत मी ज्या भूमिका साकारल्या त्यांच्या पेहरावाची नेहमीच प्रशंसा झालीय. भरजरी साड्या, दागिने ही माझ्या भूमिकेची प्रमुख ओळख बनली असं म्हण्टलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र मी आता साकारत असलेली वसुंधरादेवी हे पात्र याच्या पूर्ण वेगळं आहे".
हर्षदा खानविलकर पुढे म्हणाल्या,"अत्यंत साधी रहाणी असलेल्या वसुंधरादेवीचा गावात मात्र दबदबा आहे. या भूमिकेचं वेगळेपण म्हणजे मी आत्मसात केलेली कोल्हापुरी भाषा. कोल्हापुरवर माझं विशेष प्रेम आहे. प्रेक्षकांनी आजवर माझ्या प्रत्येक भूमिकेवर भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम वसुंधरादेवींनाही मिळेल याची खात्री आहे".
आता नव्या वेळेत पाहा 'सुख म्हणजे नक्की काय असतं'
'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका 20 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांना नव्या वेळेत पाहायला मिळणार आहे. 20 नोव्हेंबरपासून रात्री 10 वाजता प्रेक्षक ही मालिका पाहू शकतात. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका पहिल्या पाचमध्ये आहे. दिवसेंदिवस या मालिकेची क्रेझ वाढत चालली आहे.
संबंधित बातम्या