Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. मालिकेतील रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आज या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे.
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेने नुकतेच 300 भाग पूर्ण केले असून मालिकेत दर आठवड्याला उत्सुकता वाढवणारं नवं वळण पहायला मिळत आहे. सध्या मनोरमा कोण या प्रश्नाने संपूर्ण महाराष्ट्राला कोड्यात टाकलं आहे. मनोरमा कोण आहे, याविषयी टप्याटप्याने प्रेक्षकांना एकेक गोष्ट या मालिकेत पाहायला मिळेल.
अव्दैत-नेत्रा मनोरमाचं रहस्य शोधणार
मनोरमाच्या रहस्याविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांची ओढ पाहून 20 ऑगस्टच्या महाएपिसोडची रचना करण्यात आली आहे. मनोरमाच्या रहस्याला दिशा देणारा हा महाएपिसोड असणार आहे. अव्दैत-नेत्राला कळतं की मनोरमाला पद्माकर आजोबा आणि भालबा म्हणजेच आबा हे दोघेही ओळखतात. हा समान धागा पकडून अव्दैत-नेत्रा मनोरमाचं रहस्य शोधायला सुरुवात करतात.
मनोरमाचं राजाध्यक्षांच्या घरात नेत्राला दिसणं, पद्माकर आजोबांचं भूतकाळ आठवून अस्वस्थ होणं, इंद्राणीने रूपालीला आजोबांना मारायला सांगणं, नेत्राला दिसणाऱ्या मृत्यूच्या संकेतांची साखळी अशा महत्त्वपूर्ण गोष्टींचा उलगडा 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत लवकरच होणार आहे.
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेचा रंगणार एक तासाचा विशेष भाग
अव्दैत-नेत्राने मनोरमाचा शोध घ्यायला सुरुवात केल्यामुळे मनोरमाचं सत्य काय, त्रिनयना देवीचं वरदान असलेली तिसरी स्त्री कोण असेल, मनोरमाचा आत्मा स्वतःहून नेत्राला हे सगळं सांगणार का... याची उत्तरंही प्रेक्षकांना 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका पाहताना मिळणार आहेत. त्यासाठी महाएपिसोडमध्ये मनोरमाच्या रहस्यापर्यंत अव्दैत-नेत्रा कसे पोहोचणार हे पाहायलाच हवं. हा विशेष भाग आज दुपारी दोन आणि रात्री दहा वाजता प्रेक्षक पाहू शकतात.
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेचं कथानक भिन्न असल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील वेगळा विषय प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत तितिक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या