Marathi Serial Updates Aantarpaat : छोट्या पडद्यावर वाहिन्यांमध्ये सध्या टीआरपीची शर्यत सुरू आहे. टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी नवीन मालिका सुरू होत आहेत. तर, सध्याच्या मालिकांमध्ये ट्विस्ट येत आहे. छोट्या पडद्यावर सध्या सुरू असलेल्या मालिकेत ट्विस्ट येत आहे. 'कलर्स मराठी'वरील अंतरपाट (Aantarpaat Marathi Serial) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेत ट्विस्ट येणार आहे.
'अंतरपाट' या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ही मालिका चांगलंच मनोरंजन करत आहे. गौतमी-क्षितिजचा लग्नसोहळा, घटस्फोटाचा आलेला ट्विस्ट, जान्हवीची एन्ट्री या सर्वांमुळेच मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. आता पुन्हा एकदा मालिकेत एक रंजक वळण येणार आहे. गौतमी आणि क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर जान्हवीसमोर येणार आहे.
गौतमी आणि क्षितिजमध्ये मैत्रीचं नातं बहरत आहे. गौतमीची आयुष्यात एन्ट्री झाल्यानंतर हतबल, निराश असलेला क्षितिज हा पुन्हा एकदा नव्याने आयुष्य जगू लागलेला पाहायला मिळत आहे. सर्व काही सोडून दिलेल्या क्षितिजने मुंबईत एक डीलदेखील क्रॅक केली आहे. आपल्या लेकाने मोठं यश संपादन केल्याने राजाराम यांचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि ते एका पार्टीचं आयोजन करतात. या पार्टीसाठी गौतमीने तिच्या कुटुंबियांनादेखील आमंत्रित केलेलं असतं. पार्टीदरम्यान क्षितिजचं लग्न गौतमीसोबत झाल्याचं सत्य जान्हवीसमोर येतं. त्यामुळे आता पुढे काय घडणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
मालिकेतील या नव्या ट्विस्टबद्दल जान्हवी म्हणजेच प्रतीक्षा शिवणकर म्हणाली की,"जान्हवीने एवढी वर्षे क्षितिजवर प्रेम केले आहे. त्यांनी एकत्र सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती. क्षितिजचं लग्न झाल्याचं सत्य जान्हवीला कळल्यापासूनच तिचं मानसिक खच्चीकरण सुरू झालं आहे. पण नुकतीच आयुष्यात आलेली एक चांगली मैत्रीण गौतमीच आपल्या प्रियकराची पत्नी आहे हे कळल्यावर तिचं आणखी खच्चीकरण झालंय. त्यामुळे आता यापुढे काय करायचं असा मोठा प्रश्न तिला पडलाय. तिच्यासमोरचे सर्व दरवाजे आता बंद झाले आहेत, असे प्रतीक्षाने या आपल्या व्यक्तीरेखेबद्दल सांगितले आहे.
गौतमी-जान्हवीची ऑफस्क्रीन मैत्री कशी आहे?
गौतमी-जान्हवीच्या ऑफस्क्रीन नात्याबद्दल जान्हवी म्हणजेच प्रतीक्षा शिवणकर म्हणाली,"आम्ही फार छान मैत्रीणी आहोत. अनेक गोष्टी आम्ही एकमेकींसोबत शेअर करतो. त्यामुळे काम करताना दडपण येत नाही. छान मैत्री असल्याने ऑनस्क्रीनदेखील ते दिसून येतं. खऱ्या आयुष्यात आम्हा दोघींची लग्न झालेली असून मालिकेव्यतिरिक्त आम्ही भरपूर गप्पा मारत असतो, असेही तिने सांगितले.