Kshitij Thakur : क्षितीज ठाकूर यांच्या मतदारसंघात भरली 'हास्यजत्रा', निवडणुकीच्या प्रचाराला मराठी इंडस्ट्रीतील कलाकार मंडळींची हजेरी
Kshitij Thakur : विधानसभा निवडणुकीतील उमेदवार क्षितीज ठाकूर यांच्या प्रचाराला आता मराठी इंडस्ट्रीतील कलाकार मंडळींनी हजेरी लावली आहे.

विरार : नालासोपारा विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांच्या प्रचाराला आता मराठी इंडस्ट्रीतील कलाकार मंडळींनी हातभार लावला आहे. क्षितीज ठाकूर यांच्या मतदारसंघातील प्रचारात 'हास्यजत्रा' फेम मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील हास्यविनोदी कलाकार समीर चौगुले, शिवाली परब, आणि गौरव मोरे यांनी क्षितीज ठाकूर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या बाइक रॅलीला उपस्थिती लावली.
निवडणुकीच्या प्रचाराला मराठी इंडस्ट्रीतील कलाकार मंडळींची हजेरी
गुरुवारी सकाळी चंदनसार, विरार येथून सुरू झालेली ही भव्य बाइक रॅली तुळींज आचोले येथे संपली. या रॅलीला कार्यकर्त्यांचा जोशपूर्ण प्रतिसाद लाभला, तसेच या मराठी कलाकारांना बघण्यासाठी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. बाइक रॅलीतून क्षितीज ठाकूर यांच्यासाठी समर्थन व्यक्त करताना मराठी कलाकारांनी त्यांच्या उपस्थितीने विरारमधील कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.
























