Gaurav More Maharashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणारा कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून (Maharashtrachi Hasyajatra) अभिनेता गौरव मोरेने (Gaurav More) एक्झिट घेत असल्याची घोषणा केली. आज गौरव मोरेने सोशल मीडियात पोस्ट लिहीत आपल्या निर्णयाची माहिती दिली. गौरव मोरेने हा शो सोडल्याची माहिती दिल्याने चाहत्यांना धक्काच बसला आहे. गौरव मोरेने शो का सोडला? याबद्दल चाहत्यांमध्ये चर्चा सुरू होती. अखेर गौरव मोरे यानेच आपल्या निर्णयाबाबत सूचक वक्तव्य केले. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये मानापमान नाट्य रंगल्याने गौरव मोरेने शो सोडला असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोचा मोठा चाहता वर्ग आहे. या शो मधील प्रत्येक कलाकाराचा स्वत:चा चाहता वर्ग आहे. त्यापैकी एक असलेला गौरव मोरेने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमध्ये स्किटमध्ये ‘I am a गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा, टा ना ना ना…’ या वाक्याने त्याची धमाकेदार एन्ट्री होत असे. त्याच्या या एन्ट्रीला प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटत असे.
शो सोडण्याची केली घोषणा
फिल्टर पाड्याचा बच्चन असणाऱ्या गौरव मोरेने आपल्या धमाल परफॉर्मेन्सने शोमध्ये धुमाकूळ घातला होता. आता, गौरवने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या सेटचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आणि यामध्ये त्याने आपण महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडले असल्याचे सांगितले. गौरवने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मला सांगताना खूप वाईट वाटत आहे की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधुन आपला निरोप घेत आहे. माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो,असेही त्याने म्हटले.
चाहत्यांची नाराजी, गौरवने सांगितले शो सोडण्याचे कारण...
गौरव मोरेच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी शो सोडत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. काही चाहत्यांनी त्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. तर, काहींनी गौरवचे ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांना गौरवने प्रत्युत्तर दिले आहे. एका युजरने म्हटले की, “पैसा बहुत कमिनी चीज होती है”. त्याला उत्तर देताना गौरवने म्हटले की, “Respect बडी चीज है भाई” असे म्हटले.
तर,एका महिला प्रेक्षकाने म्हटले की, “निरोप घेऊ नका. तुम्हाला इथे जे प्रेम मिळाले त्याची तुलना कुठल्याही दुसऱ्या कार्यक्रमाबरोबर करता येणार नाही. तुमचा हिंदी कार्यक्रम मी बघते. तो हास्यजत्रे इतका दर्जेदार नाही. मराठी तुमची मायबोली आहे, तुमचं काम मराठीत खूप खुलून येतं. मराठी सिनेमा बघणारे कमी लोक आहेत”. त्याला उत्तर देताना गौरवने “का सोडला असेल ह्याचा पण विचार होऊ द्या” असे उत्तर दिले आहे.
गौरव मोरेच्या आधी महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ओंकार भोजनेने एक्झिट घेतली होती. गौरव मोरे सध्या सोनी वाहिनीवरील मॅडनेस मचायेंगे या शोमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्याच्यासोबत हेमांगी कवी, कुशल बद्रिके हे मराठी कलाकार आहेत.