Bigg Boss Marathi New Season Day 13 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) आता रंग भरू लागले आहेत. स्पर्धकांनी आपला खेळ खेळण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या सीझनमध्ये काही दिग्गज सेलिब्रिटी असले तरी सध्या 'गुलिगत धोका' फेम सूरज चव्हाणची (Suraj Chavan) जोरदार चर्चा सुरू आहे. बिग बॉसच्या घरात सुरुवातीला शांत असणारा सूरज टास्कच्या वेळी उसळला असल्याचे दिसून आले. पहिल्या काही दिवसात सूरजला एकटं पाडण्यात आल्याचे चित्र होते. मात्र, सूरजने आता घरातील सदस्यांचे आपल्याबद्दलचे मत बदलण्यास भाग पाडले आहे.
बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये सूरज चव्हाणने एन्ट्री केल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावर सूरजला ट्रोल करण्यात आले. बिग बॉसच्या घरात गुलिगत सूरजला खेळ कळलाच नाही, असे म्हटले जाऊ लागले. पण त्याने स्वत:वर मेहनत घेतली आणि आपला खेळ दाखवायला सुरुवात केली आहे. वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनेदेखील सूरजच्या खेळीचं कौतुक केले. तसेच त्याला यापुढेही गुलिगत पॅटर्नने खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. आता, 'बिग बॉस मराठी'चा सूरज चव्हाणवर एक प्रोमो आला आहे.
''सूरजला माणसं कळली...''
'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये 'गुलिगत' सूरज चव्हाण गार्डन एरियामध्ये केर काढताना दिसत आहे. त्यावर 'कोकण हार्टेड गर्ल' आणि यंदाच्या सीझनची पहिली कॅप्टन अंकिता प्रभू वालावलकर आणि अभिनेता पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे चर्चा करताना दिसत आहेत. अंकिता म्हणतेय,"सूरजला असं बघून मला कसंतरी वाटतं". त्यावर पॅडी म्हणतो,"बिचारा बाहेरदेखील हेच काम करत असेल. तो काल मला म्हणालेला, दादा मला खूप वाईट वाटतं मी वर झोपतो आणि तुम्ही खाली झोपता", असे म्हणत पॅडी सूरजची निरागसता आणि त्याचे स्वच्छ मन यावर भाष्य करतो. त्यावर अंकिता म्हणते,"सूरजला गेम कळला नाही, पण माणसं कळली".
'टिक टॉक'चा पहिल्या दहात स्थान मिळवणारा स्टार अर्थात गुलिगत सूरज चव्हाणचं नेटकऱ्यांकडून चांगलंच कौतुक होत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतला स्टार सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीचं घरदेखील गाजवत आहे. सोशल मीडियावर सूरजला चांगला पाठिंबा मिळत आहे.