Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai : 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' (Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai) ही मालिका गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. वेगळा विषय, वेगळ्या धाटणीची असूनही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडली. त्यामुळे निर्मात्यांनी आता ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 


'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' (Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai) या मालिकेचा येत्या काही दिवसांत शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. या मालिकेची जागा अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte) 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम घेणार आहे. 


'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' या मालिकेची स्टारकास्ट उत्तम आहे. मालिकेचा विषय वेगळ्या धाटणीचा आहे. प्राईम टाईममध्ये ही मालिका प्रसारित केली जात आहे. पण तरीही टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका मागे पडली आहे. नुकत्याच समोर आलेल्या टीआरपी रिपोर्टनुसार, टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका 35 व्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 0.9 रेटिंग मिळाले आहे. 


'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' या मालिकेत घराघरात घडणारी सासू सूनांची भांडणं विनोदी पद्धतीने दाखवण्यात आली होती. आजच्या आधुनिक काळात, सासू-सूनेमधील नातं, एकमेकींशी कधी भांडत तर कधी एकमेकींना चिमटे काढत कसं बहरत जातं याचा धमाल प्रवास प्रेक्षकांना 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' या मालिकेत पाहायला मिळाला. या मालिकेत सुकन्या कुलकर्णी आणि स्वानंदी टिकेकर मुख्य भूमिकेत होते. 


'हा' कार्यक्रम होणार सुरू


'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' या मालिकेची जागा 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम घेणार आहे. 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम पुन्हा सुरू होत असल्याने पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गुपिते उलगडली जाणार आहेत. सेलिंब्रिटींपासून राजकारणी मंडळींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 






संबंधित बातम्या


Khupte Tithe Gupte : आता खुपणार नाही तर टोचणार! पुन्हा सुरू होतंय 'खुपते तिथे गुप्ते'