Aai Kuthe Kay Karte : महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेली पाच वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या प्रवासात मालिकेतील प्रत्येक कलाकाराला महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून प्रेम आणि आपुलकी मिळाली. देखमुख कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग झाली. भरभरुन प्रेम मिळाल्यानंतर आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. प्रेक्षकांप्रमाणेच कलाकारांनाही मालिकेची सांगता होतेय याची हुरहुर आहे. अरुंधतीचं पात्र साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकर ही या मालिकेमुळे घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनात पोहोचली. आता मालिका निरोप घेत असताना मधुराणी प्रभुलकर हिने आतापर्यंतच्या प्रवासावर प्रतिक्रिया दिली आहे.
'आई कुठे काय करते' प्रेक्षकांचा निरोप घेणार
मालिकेच्या प्रवासाविषयी मधुराणी म्हणाली की, 'आई कुठे काय करते मालिका सुरु झाली तेव्हा खरंच असं वाटलं नाही की, हा इतका मोठा आणि सुखकारक प्रवास असेल. पाच वर्ष चालणाऱ्या आणि प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळालेल्या प्रोजेक्टचा आपण भाग होणार आहोत याची कल्पनाच नव्हती. ही पाच वर्ष कशी गेली खरंच कळलं नाही. महिन्याचे 20 ते 22 दिवस आम्ही शूट करायचो, बराचसा वेळ हा सेटवरच जायचा.
अरुंधतीला अजूनही आठवतो 'तो' सीन
अरुंधतीला प्रत्येकासोबतच खूप जीवाभावाचे सीन्स करायला मिळाले. भूमिकेचा आलेख कसा असेल, याचा मला अजिबात अंदाज नव्हता. इतकं वास्तवाला भिडणारं काहीतरी आपण करणार आहोत, याची कल्पनाच नव्हती. मला अजूनही तो सीन आठवतो जिथे अनिरुद्ध अरुंधतीला हाताला धरुन बाहेर काढतो. तो म्हणतो की, तू नको आहेस मला तुझ्या हातांना मसाल्याचा वास येतो. हे ऐकून अरुंधतीला धक्का बसतो आणि तिला पहिला पॅनिक अटॅक येतो. असा एखादा सीन मालिकेच्या सुरुवातीलाच करायला मिळणं, हे मी माझं भाग्य समजते. हा आणि असे अनेक सीन कायम लक्षात रहातील.
"हे क्षण पुन्हा जगता येणार नाहीत याची हुरहुर"
"हे क्षण पुन्हा जगता येणार नाहीत याची हुरहुर आहेच. अरुंधती या पात्राचे इतके वेगवेगळे पदर साकारले आहेत की खरंच सांगताना भावनाविवश व्हायला होतं. प्रेक्षक येऊन भेटतात, डोळ्यात पाणी असतं. अरुंधतीमध्ये ते कुठेतरी स्वत:ला पाहात असतात. प्रत्येक स्त्रीचा आरसा असणारं पात्र या मालिकेच्या माध्यमातून साकारायला मिळालं यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजेन. मालिकेच्या सहकलाकारांबरोबर निर्माण झालेला बंध आणि एक चांगली भूमिका निभावल्याचं समाधान चिरकाल लक्षात राहिल, असंही मधुराणीने म्हटलं आहे.