Tejaswini Pandit demands strict action over viral clip: आज देशभरात रंगपंचमी अगदी उत्साहात साजरी करण्यात आली. रंगांची उधळण करत अनेकांनी पुरणपोळीवर ताव मारला. सोशल मीडियावर धुळवडीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, एका व्हिडिओमुळे तुमची तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते. या व्हिडिओवर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. उत्साहाला गालबोट लावणारा हा धक्कादायक व्हिडिओ हरियाणा येथील असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडिओत काही नराधमांनी मजा मस्तीच्या नावाखाली चक्क गायीला दारू पाजली आहे. हा व्हिडिओ पाहून नक्कीच कुणाचंही रक्त सळसळेल. या व्हिडिओवर अनेकांनी रोष व्यक्त केला. तसेच मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हा व्हिडिओ पाहून चांगलीच संतापली आहे. तिनं नराधमांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
सण होळीचा, पण एका व्हिडिओमुळे या सणाला गालबोट लागला असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडिओ हरियाणातील एका भागातील आहे. या भागात होळीचं सेलिब्रिशन सुरु असतं. पण काही नराधमांनी मिळून भयंकर कृत्य केलं. काही लोकांनी मस्तीच्या नावाखाली गायीला जबरदस्तीनं दारू पाजली. हे नराधम इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी गायीला गाडी ओढायला लावली. या गाडीवर काही लोक बसून मजा घेत होते. अक्षरश: धिंगाणा घालत होते.
ही घृणास्पद वागणूक पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला. तेजस्विनी पंडित हिनं देखील रोष व्यक्त केला.
तेजस्विनी पंडित कायम अन्यायाविरोधात आवाज उठवते. ती आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. तिनं हा व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. तसेच संताप व्यक्त करत नराधमांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. तिनं व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, 'व्हिडिओत उपस्थित सर्वांना तातडीने अटक करा; अशा विकृत मानसिकतेच्या लोकांमुळेच सणाचं पावित्र्य धोक्यात येतं', असं तेजस्विनी म्हणाली. व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
