Tanishaa Mukerji Power Cut: अभिनेत्री तनिषा मुखर्जी (Tanishaa Mukerji) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण सध्या चर्चेत येण्यामागचं कारण बॉलिवूड नसून, वैयक्तिक कारण आहे. वडिलोपार्जित लोणावळ्यातील (Lonavala) घरातील विजेच्या समस्येमुळे तनिषा मुखर्जी त्रस्त झाली आहे. काजोलची बहीण तनिषा मुखर्जीने मंगळवारी सोशल मीडियावर महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या (MSEB) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तसेच आपली नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत असा आरोप केला की, तिच्या घरातील वीज कनेक्शन खंडीत करण्यात आले आहे. तसेच मोठ्या रकमेची वीज बिल भरण्यास सांगितले आहे. तनिषाने पोस्ट शेअर करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना टॅग केलं आहे.
तनिषा मुखर्जीचा वीज बिलावरुन संताप (Tanishaa Mukerji Claims Power Cut at Lonavala Home)
तनिषा मुखर्जीने लोणावळ्यातील वीज विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. तिने आपल्या पोस्टद्वारे वीज विभागाकडून अधिक रकमेची वीज बिले पाठवली जात असल्याचा आरोप केला असून, वीज बिल भरण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं तिने म्हटलं आहे. 'महाराष्ट्र राज्य वीज मंडळ माफियासारखे वागत आहे! ते मोठ्या रकमेची वीज बिले पाठवत आहेत आणि वीज कापून पैसे भरण्यासाठी दबाव टाकत आहेत. हा निव्वळ गुन्हा आहे!', असं तिने म्हटलं आहे. अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये दावा केला की, तिच्या लोणावळ्यातील घरातील वीज कनेक्शन शनिवारी खंडित करण्यात आली आहे. अंतिम मुदत आली नसतानाही ही कारवाई करण्यात आली आहे, असं तिने म्हटलं आहे. तसेच अभिनेत्रीने वीज विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईला चुकीचे असल्याचं म्हटलं आहे.
आपल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर संबंधित व्यक्तींना टॅग केले आहे. तसेच लोणावळ्यातील वीज व्यवस्थेकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यासह तिने टाटा पॉवरलाही टॅग केलं आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सोशल मीडियातील काही युझर्सनेही तिच्या पोस्टवर कमेंट करुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. एकाने कमेंटमध्ये, 'वीज बिल थकले आहे, तर बिल भरण्यासाठी अंतिम मुदतपर्यंत का थांबावे?', असं सवाल उपस्थित केला आहे. या कमेंटचं उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, 'अंतिम मुदतीपर्यंत का थांबली? हा मुळात प्रश्न नाही. वीज खंडीत होण्याबद्दल आणि पडताळणी न अवाजवी बिल भरण्यासाठी दबाव आणला जात आहे', याबद्दल तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याचं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
