Marathi Actor Suyash Tilak Stucks At Shrilanka Airport: श्रीलंकेत महाप्रलय (Sri Lanka Flood) आलाय, पूरपरिस्थिती फारच गंभीर झाली आहे. मुसळधार पावसामुळे (Rain Updates) देशाचा मोठा भाग पाण्याखाली गेलाय. तर, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय. पूर आणि भूस्खलनामुळे अनेक ठिकाणची परिस्थिती गंभीर बनलीय. आतापर्यंत या महाप्रलयात 56 जणांचा मृत्यू झालाय आणि 600 हून अधिक घरांचं मोठं नुकसान झालंय. अनेक घरं चिखलाखाली गाडली गेली आहेत आणि अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुरामुळे या दोन्ही जिल्ह्यांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. श्रीलंकेतील पूरपरिस्थितीचा फटका एका मराठी अभिनेत्याला (Marathi Actor) बसला आहे. पूरपरिस्थितीमुळे अभिनेत्याला तब्बल 24 तासांहून अधिक काळ विमानतळावरच अडकून राहावं लागलं. या परिस्थितीचा अंगावर शहारे आणणारा अनुभव अभिनेत्यानं शेअर केलाय.

Continues below advertisement


मराठी अभिनेता सुयश टिळक (Marathi Actor Suyash Tilak) श्रीलंकेत उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे तिथल्या विमानतळावरच अडकून पडलेला. त्यानं यासंदर्भात एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. तसेच, त्यानं या परिस्थितीचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.  


सुयश टिळकनं शेअर केला अंगावर काटा आणणारा 'तो' अनुभव


मराठमोळा अभिनेता सुयश टिळकनं (Suyash Tilak) कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "तो सामान्य दिवस नव्हता आणि हे फोटो/व्हिडीओ सामान्य नाहीत... श्रीलंकेला मुसळधार पाऊस, चक्रीवादळ आणि पूर आला होता आणि आम्हाला इमिग्रेशन पूर्ण झाल्यानंतरच आम्हाला टेकऑफला विलंब झाल्याची आणि शेवटी रद्द झाल्याची बातमी मिळाली. माझ्यासोबत 21 जणांचा ग्रुप होता. ज्यांची जबाबदारी माझ्यावर आणि माझ्या मित्रांवर होती. एअरलाइनमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता होती, कारण त्यांच्याच देशात हाहाकार माजला होता. स्थानिक लोक कामावर येऊ शकले नाहीत. आपत्तीची परिस्थिती खरी होती. हवामान कोणत्याही विमानाच्या उड्डाणासाठी अजिबात अनुकूल नव्हतं."


"लवकरच लोकांचा ओरडाआरडा ऐकू येऊ लागला, ज्यांनी उड्डाणं रद्द केली होती आणि बाहेर पडू शकले नव्हते, ते 24 तास विमानतळावर अडकले होते आणि आम्हालाही असंच काहीसं अनुभवावं लागेल याची कल्पना नव्हती... सामान्य परिस्थितीत एअरलाइन्सनं भरपाई दिली असती. पण हा काही सामान्य दिवस नव्हता. त्यांच्यासाठी हा राष्ट्रीय आपत्ती होती. चक्रीवादळ आणि पावसानं देशाच्या 85 टक्के भागात पूर आला होता. प्रत्येक व्यक्तीचं मोठं नुकसान झालं होतं. विमानतळाच्या कर्मचाऱ्यांनाही कामावर येणं कठीण झालं होतं. 40 पेक्षा जास्त मृत्यू, 80 पेक्षा जास्त बेपत्ता आणि 18 हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले होते आणि तरीही एअरलाइन्स आणि विमानतळ सुरू ठेवणं त्यांना भाग होतं. त्यामुळे ही एअरलाइन्सची चूक नव्हती की, ते कमी स्टाफमध्ये काम करत होते किंवा प्रत्येक विनंतीला 'नाही' म्हणत होते. त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता...", असं सुयश टिळक म्हणाला. 


"मी अनेक अनोळखी लोकांना भेटलो, अनोळखी कथा ऐकल्या. काही निष्काळजी लोक एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांवर ओरडत होते, शिवीगाळ करत होते, आणि तिथे फक्त तीन स्त्रिया हजारो रागावलेल्या प्रवाशांना सांभाळत होत्या. अनेक फ्लाइट रद्द वा बदलल्या जात होत्या. श्रीलंकन लोक ज्यांची स्वतःची घरं गेली होती, कुटुंबे संकटात होती, भूस्खलन, पूरग्रस्त रस्ते, वाहनं, घरं, अडकलेले पर्यटक, अडकलेले स्थानिक, बाहेर प्रचंड गोंधळ चालू असताना विमानतळाच्या आत आणखी एक गोंधळ तयार होत होता.", असं सुयश म्हणाला. 


पुढे बोलताना सुयश टिळकनं सांगितलं की, "पर्यटक संयम गमावत होते, एअरलाइन्स कर्मचार्‍यांवर आणि मग एकमेकांवर राग काढत होते. प्रत्येकाला स्वतःला प्राधान्य हवं होतं, प्रत्येकाला घरी लवकर पोहोचायचं होतं. बर्‍याचजणांना ह्याची जाणीव नव्हती की त्यांना मदत करण्यासाठी काम करणाऱ्या स्थानिकांनी त्यांच्या स्वतःच्या घरी यापेक्षा खूप मोठं नुकसान सहन केलं आहे."






सुयश टिळकनं लिहिलंय की, "गेल्या 38 तासांत मी काही अद्भुत लोकांना भेटलो. पायलट्स, फ्लाइट अटेंडंट्स, ग्राउंड स्टाफ, क्लिनिंग क्र्यू, शेफ, वेटर्स, भारतीय, श्रीलंकन, दक्षिण आफ्रिकन, इंडोनेशियन, युरोपियन, एशियन, NRI, इंग्लिश—म्हणजे अक्षरशः संपूर्ण जग एकाच छताखाली होतं. आणि त्याचबरोबर काही अतिशय स्वार्थी लोकांनाही पाहिलं."


सुयश टिळक म्हणाला की, "प्रत्येक आईच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहिले. तिच्या छोट्याशा मुलाचं काय होणार याची तिला कल्पना नव्हती. काहींना फक्त स्वतःची काळजी होती. काहीजण स्वतःचं सर्व विसरून निस्वार्थपणे काम करत होते. काहीजण अत्यंत संयमी व्यावसायिक होते. हा एक असा वेडापिसा अनुभव होता जो पुन्हा कधी मिळेल असं नाही... even if I pay for it. एका बाजूला जबरदस्त विनोदबुद्धी आणि आशावाद पाहिला, तर दुसऱ्या बाजूला तीव्र नकारात्मकता… काहीजण अत्यंत मदतशील आणि सकारात्मक होते, तर काही सतत रडारड, तक्रारी आणि रागाच्या चेहऱ्यानं फिरत होते."


"मी स्वतः काही अतिशय अभिमानाचे क्षण अनुभवले. जेव्हा पर्यटकांनी मला 'हिरो' म्हटलं कारण मी माझ्या परीने जे शक्य होतं ते करण्याचा प्रयत्न केला. आणि काही अतिशय खालचे क्षणही अनुभवले. जेव्हा मला जाणवलं की लोकांचा आत्मविश्वास उंच ठेवणं किती अवघड होत चाललं आहे… आणि मीच खचलो तर त्यांचं मनोबल कोसळेल. मी अतिशय विविध भावना आणि असंख्य कहाण्या अनुभवल्या... UL 141—तू कायम लक्षात राहशील, कायम जपला जाशील...", असं सुयश टिळकनं म्हटलंय.