मुंबई : 'सुशांत स्वप्न बघणारा मुलगा होता. अवघ्या 23-24 वर्षांचा तो मुलगा मोठी स्वप्न घेऊन आला होता. मालिकांमधून सिनेमामध्ये गेला. तिथेही त्याला चांगले सिनेमे मिळाले. त्याला जे हवं ते सगळं मिळत होतं. शिवाय त्याचे त्यानंतर काय करायचं याचे प्लॅनही होते. असं असणारा सुशांत आत्महत्या करूच शकत नाही. मला खात्रीनं वाटतं त्याला मारलं गेलं असणार.', अशा थेट शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी सुशांतबद्दलच्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. येत्या 14 जूनला सुशांत जाऊन एक वर्षं होतं आहे. या एक वर्षात त्याच्याबाबत काय काय घडलं यावर खास बोलताना एबीपी माझाशी उषाताई बोलल्या. 


सुशांत सिंह राजपूत आणि उषा नाडकर्णी यांचा संबंध आला तो पवित्र रिश्ता या मालिकेमुळे. ही मालिका सुशांतच्या हाती आली तेव्हा सुशांत अवघ्या 23-24 वर्षांचा होता. त्याबद्दल बोलताना उषाताई म्हणाल्या, 'आम्ही सेटवर भेटायचो. बोलायचो. फारच मोकळा होता तो. सतत काहीतरी वाचत असायचा. त्यावेळी मला आठवतं. त्याला बांद्र्यात फ्लॅट घ्यायचा होता. त्याची किंमत होती दोन कोटी रूपये. मला म्हणाला, ताई मैं फ्लॅट लेना चाहता हूं. बांद्रा मे है. मी त्याला विचारलं, अरे तू इतके पैसे कसे कमावणार. तर मला म्हणाला, करेंगे ताई. हसतमुख होताा. या इंडस्ट्रीत येऊन काय करायचं हे त्यानं ठरवलं होतं.'


अशा काही आठवणी सांगताना त्या म्हणाल्या, 'असा मुलगा आत्महत्या कशी करेल? माझ्या मनाला ते पटत नाही. माझं मन सांगतं त्याची हत्याच झाली असणार. नाहीतर मला सांगा, गेल्या वर्षभरापासून त्याच्या मृत्यूचा तपास चालू आहे. अजून काहीच कसं का हाती लागलेलं नाही? पोलिसांपासून भारतातल्या मोठ्या मोठ्या तपास यंत्रणा या कामात लागल्या आहेत. वर्ष झालं तरी सुशांतचं नेमकंं काय झालं ते यांना कळलेलं नाही? मग तपासही लागत नसेल तर मग काहीतरी काळंबेरं असणार आहे असं वाटू लागतं. आणि तसं का वाटू नये?'


पाहा व्हिडीओ : #SSR "सुशांत आत्महत्या करूच शकत नाही" एक वर्ष झालं तरी तपास पूर्ण का नाही? उषा नाडकर्णी EXCLUSIVE



सुशांत गेल्याची बातमी आल्यानंतर उषा नाडकर्णी यांना शोक अनावर झाला होता. त्यावेळी त्यांना सुशांत गेल्याचं कळल्यावर अश्रू अनावर झाले होते. त्या आठवणीबद्दल त्या म्हणाल्या, सुशांत गेल्याची बातमी मला माझ्या हेअर ड्रेसरने दिली. ती म्हणाली, ताई सुशांत गया. मला खरंच वाटलं नाही. मी म्हणाले, नही रे, और कोई सुशांत होगा. मग ती म्हणाली, नहीं ताई हमाराही सुशांत है. हे ऐकून मला फार धक्का बसला. मी त्याला काही वर्षं बघत होते. त्यानंतर त्याचं झालेलं करिअर मी पाहिलं. तो आत्महत्या कशी करेल असं मला तेव्हाही वाटलं होतं. ही बातमी ऐकून माझा जीव कळवळला. फार वाईट वाटलं असं ही त्यांनी सांगितलं. 


काय पो छे, एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी, ड्राईव्ह, दिल बेचारा आदी चित्रपटांत झळकलेल्या अभिनेता सुशांतसिंह राजपूत 14 जून 2020 ला कार्टर रोडवरच्या आपल्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळला होता. गेल्या वर्ष भरापासून सीबीआय त्याच्या मृत्यूचा तपास करत आहे.