Sushant Singh Rajput Rhea Chakravarti Case:अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Rajput) याने 2020 मध्ये राहत्या घरात आयुष्य संपवलेलं. त्याच्या मृत्यूनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं या प्रकरणाच्या ड्रग कनेक्शनचा तपास सुरू केला होता. यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakravarti) आणि तिचा कुटुंबीयांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणात तब्बल सहा वर्षांनी मोठी अपडेट समोर आली आहे. बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू प्रकरणी गोवण्यात आलेली रिया, तिचा भाऊ शोविक आणि आई संध्या चक्रवर्ती यांची गोठवलेली बँक खाती पुन्हा सुरू करण्याचे आदेश मुंबईतील विशेष एनडीपीएस न्यायालयाने दिले आहे. (Sushant Rajput Case)
या प्रकरणात 2020 च्या सप्टेंबर महिन्यात एनसीबीने रिया आणि तिच्या नातेवाईकांची चार बँक खाते गोठवली होती. यात आयसीआयसीआय बँक तसेच ॲक्सिस व कोटक महिंद्रा बँकेतील खात्यांचा समावेश होता.
न्यायालयाने काय म्हटलं ?
एनडीपीएस न्यायालयाने सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील रिया चक्रवर्ती आणि कुटुंबीयांच्या प्रकरणात चार स्वतंत्र आदेश दिले आहेत. न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना असं म्हटलं की ' NCB ने बँक खाते गोठवताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन केलेलं नाही. एनडीपीएस कायद्याच्या कलम 68 F (2) नुसार, कोणतीही मालमत्ता किंवा बँक खाते गोठवल्यानंतर तीस दिवसांच्या आत सक्षम प्राधिकरणाकडून त्यांची पुष्टी करून घेणं अनिवार्य असतं. पण एनसीबीने ही प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती. विशेष न्यायाधीश युसी देशमुख यांनी याला गंभीर कायदेशीर चूक म्हटली असून ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे ही खाती यापुढे गोठवून ठेवणं बेकायदेशीर असेल असे स्पष्ट केले.
रिया चक्रवर्तीच्या वकिलांचा खुलासा
अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादात असं सांगितलं की सहा वर्षांपासून ही खाती बंद आहेत.परिणामी चक्रवर्ती कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. कर्मचाऱ्यांचे पगार टॅक्स भरणे तसेच दैनंदिन गरजांसाठी या खात्यांची आवश्यकता आहे. गेल्या वर्षी सीबीआयने या प्रकरणातील या चक्रवर्तीला क्लीन चीट दिल्यानंतर कोर्टाच्या या निर्णयामुळे रिया चक्रवर्तीला दिलासा मिळाला. रिझर्व बँकेच्या नियमानुसार आता रिया चक्रवर्तीला तिचे व्यवहार गोठवलेल्या खात्यांमधून लवकरच करता येणार आहेत.
