Suraj Chavan Bungalow House Photo Viral: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता आणि अवघ्या महाराष्ट्राचा (Maharashtra News) गुलिगत स्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या चर्चेत आहे. सूरज चव्हाणची सध्या लगीनघाई सुरू आहे. नुकतेच त्याच्या लग्नाच्या शॉपिंगचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता सूरज चव्हाणनं आणखी एक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. सूरज चव्हाणचं स्वप्न पूर्ण झालं आहे. सूरज चव्हाणचं बारामतीत मोठ्ठं घर बांधून पूर्णपणे तयार झालं असून नुकतीच त्याच्या घराची वास्तुशांती पार पडली. सूरजनं स्वतः यासंदर्भात माहिती दिली असून व्हिडीओमधून त्यानं त्याच्या नव्याकोऱ्या आलिशान घराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
बिग बॉस जिंकल्यानंतर सूरजनं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली होती. तेव्हाच त्यांनी सूरजला घर बांधून देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सूरज चव्हाणच्या घराचा पाया खणण्यात आला आणि घराचं बांधकाम सुरू झालं. त्यानंतर अजित पवारांनी सूरज चव्हाणच्या घराची वेळोवेळी चौकशी करत पाहणी देखील केली होती. अशातच आता सूरज चव्हाणचं आलिशान घर बांधून पूर्ण तयार झालं असून त्याची वास्तुशांतीही पार पडली आहे.
सूरजच्या घराचा लूक कसा?
सूरज चव्हाणचं दुमजली घर फारच प्रशस्त आणि मोठ्ठं आहे. आतमध्ये अगदी मोठमोठ्या खिडक्या, त्यांना चकचकीत काचा आहेत. तर, फ्लोरिंग, किचन सगळं सगळं अगदी हायटेक आणि अद्ययावर टेक्नॉलॉजीनं परिपूर्ण आहे. तर, हाय सीलिंगमुळे अलिशान असा लूक घराला आला आहे. घराबाहेर मोठ्ठं अंगण, घराच्या आतमध्ये येताच मोठ्ठा हॉल आहे. त्यालाच लागून मोठ्ठं किचन आहे. तर, दुसऱ्या मजल्यावर काही खोल्या आहेत. सूरज चव्हाणचं घर खूपच सुंदर दिसतंय.
सूरजच्या घरी लगीनघाई
सूरज चव्हाणनं काही दिवसांपूर्वी अजित पवारांची भेट घेत त्यांना नव्या घराच्या पूजेचं आणि लग्नाचंही आमंत्रण दिलेलं. सूरज चव्हाणच्या लग्नाला अजित पवार हजेरी लावणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. सूरज चव्हाणच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. येत्या 29 नोव्हेंबरला सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकणार आहे. सूरज त्याच्या मामाची मुलीसोबत लग्न करतोय.
दरम्यान, सूरजची परिस्थिती तशी बेताचीच होती. लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरवलेला सूरज चव्हाण त्याच्या बहिणींकडे लहानाचा मोठा झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मोठा झालेल्या सूरजनं सोशल मीडियाचा आधार घेतला आणि आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे तो प्रसिद्ध झाला. पण, तिथेही त्याची काही लोकांनी फसवणूक केली. पण, सूरजचं नशीब खऱ्या अर्थानं पालटलं ते, बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर. संपूर्ण महाराष्ट्रानं सूरज चव्हाणला भरभरून प्रेम दिलं आणि सूरज चव्हाणनं थेट विजेतेपद पटकावलं. आता सूरजला आपलं हक्काचं घर मिळालं आहे. तसेच, नव्या घरात आपल्या होणाऱ्या बायकोसोबत लवकरच सूरज चव्हाण आपला संसार थाटणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :