Supreme Court On Ekta Kapoor : 'तुम्ही देशातल्या तरुणाईची मानसिकता दूषित करत आहात' असं म्हणत सुप्रीम कोर्टानं एकता कपूरला (Ekta Kapoor)झापलं आहे. 'ट्रीपल एक्स'सिरीजमधील आक्षेपार्ह सीन्समुळे सुप्रीम कोर्टाने खडे बोल सुनावले आहेत.   ‘ट्रिपल एक्स’ या वेबसिरीजमधील आक्षेपार्ह दृश्यांवरून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी निर्माती एकता कपूरला फटकारले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म 'अल्ट बालाजी' वर प्रसारित झालेल्या वेब सीरिजमध्ये सैनिकांचा अपमान केल्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्याच्या आरोपाखाली जारी केलेल्या अटक वॉरंटला आव्हान देणाऱ्या एकता कपूरच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी पार पडली.  


तुम्ही तरुणांचे मनं प्रदूषित करत आहात


न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती सीटी रवी कुमार यांच्या खंडपीठाने म्हटलं की, काही तरी करायला हवं. आपण या देशातील तरुण पिढीचे मानसिकता दूषित करत आहात. ते सर्वांसाठी उपलब्ध आहे. OTT सामग्री सर्वांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही लोकांना कशा प्रकारचे पर्याय देत आहात? याशिवाय तुम्ही तरुणांचे मनं प्रदूषित करत आहात, असं कोर्टानं म्हटलं आहे. 


एकता कपूरची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, परंतु या प्रकरणावर तिथं लवकरच सुनावणी होईल अशी आशा नाही. त्यांनी सांगितलं की, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही अशाच एका प्रकरणात एकता कपूर यांना संरक्षण दिले होते.


लोकांना हे कशा प्रकारचे पर्याय दिले जात आहेत


कोर्टानं म्हटलं की, लोकांना हे कशा प्रकारचे पर्याय दिले जात आहेत.  प्रत्येक वेळी तुम्ही या कोर्टात येता, मात्र आम्हाला त्याचे कौतुक करत नाही. अशी याचिका दाखल केल्याबद्दल आम्ही तुम्हाला दंड करू. कोर्टानं म्हटलं की, रोहतगी कृपया हे तुमच्या क्लायंटला कळवा. फक्त तुम्ही एक चांगला वकील घेऊ शकता. हे न्यायालय प्रभाव असलेल्या लोकांसाठी नाही तर आवाज नसलेल्यांसाठी काम करते. ज्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत, त्यांना न्याय मिळत नसेल तर विचार करा सामान्य माणसाची अवस्था काय असेल, असं कोर्टानं म्हटलं.
 
वेबसीरिजमध्ये सैनिकाच्या पत्नीचा संबंध असलेली अनेक आक्षेपार्ह दृश्ये


सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण प्रलंबित ठेवले आहे. सोबतच उच्च न्यायालयात सुनावणीची स्थिती जाणून घेण्यासाठी स्थानिक वकिलाची सेवा घेऊ शकतात, असा सल्लाही दिला. बिहारच्या बेगुसराय येथील न्यायालयाने माजी सैनिक शंभू कुमार यांच्या तक्रारीवरून एकता कपूरच्या विरोधात वॉरंट जारी केले होते. शंभू  कुमार यांनी 2020 च्या तक्रारीत आरोप केला आहे की मालिका ‘थ्री एक्स’ (सीजन-2) मध्ये सैनिकाच्या पत्नीचा संबंध असलेली अनेक आक्षेपार्ह दृश्ये दाखवली होती.