Sunil Barve : मराठी सिनेसृष्टीमधील हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे (Atul Parchure) यांचे 14 ऑक्टोबर रोजी कर्करोगामुळे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला. मराठी कलाकारांसाठी अतुल परचुरेंचं जाणं, हा न पचणारा धक्का होता. त्यांच्या अत्यंविधींना संपूर्ण मनोरंजनसृष्टीने हजेरी लावली होती. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करत शोक व्यक्त केला होता. नुकतच अभिनेते सुनील बर्वे (Sunil Barve) यांची त्यांच्या आठवणीत पोस्ट केली आहे.
अतुल परचुरे हे 'सुर्याची पिल्ले' या नाटकातून मराठी रंगभूमीवर कमबॅकही करणार होते. या नाटकासाठी त्यांनी तालमी देखील सुरु केल्या होत्या. पण कर्करोगामुळे त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण ही झुंज अपयशी ठरली आणि अतुल परचुरेंची प्राणज्योत मालवली.
सुनील बर्वेंची पोस्ट काय?
सुनील बर्वे यांनी अतुल परचुरेंसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यावर त्यांनी म्हटलं की, आज दहा दिवस झाले!एक दिवसही तुझ्या आठवणी शिवाय गेला नाही आणि इथून पुढील सगळे दिवस….जवळ जवळ ३९ वर्षांची आपली मैत्री दीड महिन्यांचा अमेरिका दौरा सोडला तर सलग इतके दिवस तू माझी किंवा मी तुझी आठवण काढायचं काही कारणंच नव्हतं.सुयोग च्या त्या अमेरिकेच्या दौऱ्याहुन परतल्यावर आपण म्हंटलं होतं, आता वर्षभर तरी तोंडं नको पाहूया!
पुढे त्यांनी म्हटलं की, पण आता तू असं काहीतरी केलंयस, की रोज येणार रे तुझी आठवण...माझ्या पहिल्या नाटकापासून तुझ्या शेवटच्या नाटकापर्यंतची आपली मैत्री, केवळ आनंददायी कधीही न विसरता येणारी...कधीही भरून न काढता येणारी पण मनापासून सांगतो, जरा घाई केलीस यार!फोटोरूपी आठवणी मोजक्याच आहेत, (आपल्या काळी का नव्हते मोबाईल कॅमेरे?) त्यातल्या त्यात आपल्या सूर्याची पिल्ले च्या फोटोशूटच्या वेळेचे काही गोड क्षण!!