Sunidhi Chauhan : भारतीय गायिका सुनिधी चौहान (Sunidhi Chauhan) हिच्या आवाजाचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये 'धूम मचाले'पासून ते 'बिडी जलईले' अशा अनेक गाण्यांना सुनिधीने आवाज दिलाय. इतकच नव्हे तर मराठी गाणीही सुनिधीने गायली आहेत. तिने गायलेलं सनई चौघडे या सिनेमातील 'कांदे पोहे' हे गाणं आजही पसंतीस उतरतं. नुकतच या गायिकेने पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यावर तिचं मत मांडलं आहे.
सुनिधीने नुकतच राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यावर दिलखुलास संवाद साधला. यावेळी तिने कलाकार म्हणूनही त्यांचं विशेष कौतुकही केलं. अनेक गाण्यांचे दाखले देत त्या गाण्याचं आणि गायकाचंही तिने भरभरुन कौतुक केलं. सध्या सुनिधीच्या या प्रतिक्रियेची बरीच चर्चा सुरु आहे.
'आमच्यात काहीच फरक नाही'
पाकिस्तानच्या कलाकारांचे जितके तिकडे चाहते आहेत, कदाचित त्यापेक्षा जास्त भारतात आहेत? यावर सुनिधी चौहानने तिचं मत व्यक्त केलं आहे. त्यामध्ये तिने म्हटलं की, मी आतापर्यंत अनेक पाकिस्तानी कलाकारांसोबत काम केलं आहे. मी त्यांना पाकिस्तानी तरी का म्हणून कारण आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा आम्ही सगळे सारखेच असतो. सारखं बोलतो, एकच जेवण जेवतो त्यामुळे आमच्यात कोणताही फरक नाही.
मी जेव्हा अमेरिका, लंडनला जाते तिथेही खूप पाकिस्तानी मित्र मैत्रीण भेटतात. त्यांची सिनेसृष्टी फार मोठी नसली तरीही त्यांची म्युझिक इंडस्ट्री फार मोठी. अनेक कलाकारांना तिथे खूप आदर दिला जातो, इथेही तो दिला जातो. कोक स्टुडिओची काही गाणी ऐकून खूप छान वाटतं. काही गाणी तर अशी आहेत की, प्रश्न पडतो कि कसं तयार केलं असेल? कसा विचार केला असेल, असं म्हणत तिने त्यांच्या गाण्याचंही कौतुक केलं आहे.