Sun Marathi Serial Actor: 'सन मराठी'वर नुकतीच सुरू झालेली रहस्यमय मालिका 'सौभाग्यवती वृंदा मोहन' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. पहिल्या प्रोमोपासूनच मालिकेतील मुख्य पात्र 'मोहन' नेमकं कोण साकारणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर या रहस्यावरचा पडदा हटला असून अभिनेता संग्राम समेळ 'मोहन'च्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच भागानंतर मालिकेची कथा, रहस्य आणि पात्रांची मांडणी यामुळे सोशल मीडियावरही या मालिकेची चर्चा रंगली आहे. रहस्य, थरार आणि भावनिक नात्यांची गुंफण असलेली 'सौभाग्यवती वृंदा मोहन' ही मालिका दररोज रात्री 9.45 वाजता सन मराठीवर प्रसारित होत आहे.

Continues below advertisement

'मोहन'च्या भूमिकेबद्दल संग्राम समेळ काय म्हणाला?

आपल्या नव्या भूमिकेबद्दल बोलताना संग्राम समेळ म्हणाला, "फायनली, मोहन हे पात्र कोण साकारणार याचा उलगडा आता प्रेक्षकांसमोर झाला आहे. मोहन ही व्यक्तिरेखा खूप सुंदर आणि भावनिक आहे. तो आपल्या कुटुंबावर आणि वृंदावर जिवापाड प्रेम करणारा आहे. पण वृंदा आणि मोहन यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं आहे, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक आणि रहस्यमय ठरणार आहे. एखाद्या थ्रिलर सिरीजप्रमाणे आमची ही मालिका आहे. आजच्या युवा पिढीला ओटीटी प्लॅटफॉर्मवरील थ्रिलर सिरीज पाहायला आवडतात. त्यामुळे मी त्यांना आवर्जून सांगेन की, ही मालिका खास तुमच्यासाठी आहे. पहिला भाग पाहायला सुरुवात केली की पुढे काय होणार, याची उत्सुकता सतत लागून राहील. मुळात मोहन आणि माझ्यात अजिबात साम्य नाही. त्यामुळे मोहनची भूमिका साकारणं माझ्यासाठीही एक मोठं आव्हान आहे."

वर्षभरानंतर मुख्य भूमिकेत पुनरागमन

या मालिकेमुळे संग्राम समेळ वर्षभरानंतर पुन्हा एकदा सन मराठीवर मुख्य भूमिकेत झळकत आहे. मात्र, ही भूमिका साकारत असल्याचं गुपित इतके दिवस जपणं त्याच्यासाठी तितकंच आव्हानात्मक ठरल्याचं त्याने सांगितलं.

Continues below advertisement

याबाबत तो म्हणाला,"वर्षभरानंतर मी पुन्हा सन मराठीवर मुख्य भूमिकेत काम करत आहे. मात्र, यावेळी मी मुख्य भूमिका साकारत असल्याचं गुपित जपणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. मालिकेचे एकापेक्षा एक भन्नाट प्रोमो प्रेक्षकांसमोर येत होते, पण मी या मालिकेचा मुख्य नायक आहे, हे सांगू शकत नव्हतो. मोहन कोण आहे, हे गुपित ठेवल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली. सध्या सोशल मीडियावर चाहत्यांकडून मिळणारं प्रेम आणि प्रतिसाद पाहून खूप आनंद होत आहे. आमच्या मालिकेची संपूर्ण टीमही खूप छान आहे, त्यामुळे काम करताना खूप मजा येते. प्रेक्षकांना जशी पुढे काय घडणार याची उत्सुकता आहे, तशीच उत्सुकता आम्हा कलाकारांनाही आहे. यापूर्वी माझ्या प्रत्येक भूमिकेवर तुम्ही जसं भरभरून प्रेम केलं, तसंच प्रेम मोहनवरही करा आणि आमच्या मालिकेला असंच भरभरून प्रेम देत राहा."

रहस्य कायम, उत्सुकता शिगेला

मालिकेच्या सुरुवातीपासूनच 'मोहन'ची ओळख गुप्त ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये विविध तर्क-वितर्क लावले जात होते. आता संग्राम समेळच्या एन्ट्रीनंतर कथेला वेगळं वळण मिळणार असून, वृंदा आणि मोहन यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं? या रहस्याचा उलगडा कसा होणार? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. थरार, भावना आणि कौटुंबिक नात्यांची अनोखी सांगड घालणारी ही मालिका आगामी भागांमध्ये आणखी रंगतदार होणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.