Marathi Actress Shilpa Thakre: मराठी मालिकांमध्ये (Marathi Serials) मुख्य आणि सकारात्मक भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री शिल्पा ठाकरे (Actress Shilpa Thakre) आता करिअरमधील एक धाडसी निर्णय घेताना दिसत आहे. नायिकेची ओळख असताना शिल्पाने पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका स्वीकारली आहे. सन मराठीवरील (Sun Marathi) लोकप्रिय मालिका 'इन्स्पेक्टर मंजू' (Inspector Manju) मध्ये शिल्पा अनुष्का पाटील ही महत्त्वाची भूमिका साकारणार असून तिच्या एन्ट्रीमुळे कथानकाला मोठं वळण मिळणार आहे.
'महाराष्ट्राची फेव्हरेट एक्सप्रेशन क्वीन' म्हणून सोशल मीडियावर लोकप्रिय झालेल्या शिल्पानं सन मराठीच्या 'नवी जन्मेन मी' (Navi Janmen Mi) या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली होती. तसेच तिने 'प्रेमा', 'परफ्युम', 'ट्रिपल सीट', 'खिचीक', 'इभ्रत' आणि 'भिरकीट' यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं असून 'सुम्मी' या हिंदी शॉर्ट फिल्ममध्ये तसेच आगामी 'द चोजन फॅमिली' या डिजिटल प्रोजेक्टमधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या नव्या भूमिकेबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली की, "नवी जन्मेन मी'नंतर प्रेक्षकांनी मला खूप प्रेम दिलं आणि नेहमी सकारात्मक भूमिकांमध्ये स्वीकारलं. त्यामुळे खलनायिकेची भूमिका करायची ऑफर आली तेव्हा मी सुरुवातीला थोडी साशंक होते. प्रेक्षक मला या भूमिकेत स्वीकारतील का हा प्रश्न होता. पण अनुष्का ही फक्त खलनायिका नाही, तिच्यामागे खूप भावना, वेदना आणि एक मोठं रहस्य आहे. अभिनेत्री म्हणून मला स्वतःला रिपीट करायचं नव्हतं, म्हणून मी हा निर्णय घेतला..."
सध्या मालिकेत मंजूची साताऱ्यात पोस्टिंग सत्या ला अटक करण्यासाठी झाली होती. मात्र सत्या ला अटक करण्याऐवजी ती त्याच्याच प्रेमात पडल्यामुळे कथेला वेगळंच वळण मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर अनुष्काची एन्ट्री होते. ती फक्त मंजूवर लक्ष ठेवण्यासाठी आलेली नसून तिच्या भूतकाळाशी जोडलेलं एक मोठं रहस्य आणि सूडाची भावना घेऊन आली असल्याचं समोर येत आहे.
अनुष्का नेमकी कोण आहे?तिचा सत्याशी काय संबंध आहे?आणि ती मंजू-सत्या यांच्या आयुष्यात कोणतं वादळ आणणार?
याची उत्तरं आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.
मुख्य भूमिकेनंतर साचेबद्ध भूमिका न स्वीकारता वेगळी भूमिका निवडण्याचा शिल्पाचा निर्णय तिच्या अभिनेत्री म्हणून असलेल्या आत्मविश्वासाची झलक देतो. तिचा हा नवा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
