Sumeet Raghvan on Toll : विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Elections) घोषणा होण्याआधी राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आचरसंहितेच्या आधी या निर्णयांची अंमलबजावणी देखील सुरु झाली. मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं म्हटलं जात होतं. पण राज्य सरकारच्या याच निर्णयावर एका मराठी अभिनेत्याकडून (Marathi Actor) तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय.
अभिनेता सुमीत राघवन याने याविषयी एक्स पोस्ट करत सद्य परिस्थिती मांडली आहे. तसेच त्याने या पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलं आहे. टोलमाफीच्या निर्णयामुळे बराच त्रास होत असल्याचं यावेळी सुमीतने म्हटलं आहे. यावर अनेकांनी कमेंट्स करत सुमीतच्या मतावर सहमती देखील दर्शवली आहे.
सुमीतची पोस्ट नेमकी काय?
सुमीतने त्याच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलं की,आम्हाला टोल माफीचे गाजर नको.परिस्थिती जास्त बिकट झाली आहे तुमच्या ह्या टोल माफीच्या निर्णयामुळे. प्रत्येक लेनमध्ये वाट्टेल तशी जड वाहनं घुसली आहेत. 25/25 मिनिटं लागतायत दहिसर टोल पार करायला.
मुंबईतील टोल माफीचा मोठा बोजा राज्याच्या तिजोरीवर
मुंबईतील आनंदनगर टोलनाका, दहिसर टोलनाका,मुलुंड-एलबीएस टोलनाका,वाशी टोलनाका आणि ऐरोली टोलनाका यांवर टोलमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबईतील टोल माफीचा मोठा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. जवळपास पाच हजार कोटी रुपयांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. मुंबईतील पाच टोलनाक्यावरील टोलमाफीचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारला जवळपास पाच हजार कोटी रुपये संबंधित कंत्राटदाराना द्यावा लागणार आहे. पाच टोलपैकी चार टोलची मुदत 2027 पर्यंत आहे तर एक टोल 2029 पर्यंत आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या सर्व हलक्या वाहनांना टोल वसुली मिळणार आहे.