Sulochana: मराठी चित्रपट विश्वात आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर (Sulochana Latkar Death) यांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मार्च महिन्यात देखील त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता, त्यानंतर त्यांना उपचारासाठी दादरच्या शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.चाहत्यांच्या मनावर राज करणाऱ्या सुलोचना दीदींचं रविवारी (4 जून) निधन झालं.
सुलोचना दीदींच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांनी आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
अभिनय क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तिमत्व हरपलं - एकनाथ शिंदे
मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात आपल्या सहजसुंदर अभिनयाने असंख्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी लाटकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तिमत्व हरपल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं.
सदाबहार व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र मुकला - देवेंद्र फडणवीस
तीनशेहून अधिक मराठी-हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाने सिनेसृष्टी संपन्न करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सुलोचनादीदी यांच्या निधनाने एका सदाबहार व्यक्तिमत्वाला आज महाराष्ट्र मुकला आहे. व्यक्तिरेखा हुबेहूब जिवंत करणाऱ्या वात्सल्यमूर्ती आणि एका महान कलावंताला आज आपण सारे मुकलो आहोत, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुलोचना दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
सुलोचना दीदींच्या निधनाचं वृत्त दु:खदायक - शरद पवार
सुमारे सहा दशके सुलोचना दीदींनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. रुपेरी पडद्यावर त्यांनी साकारलेल्या सात्त्विक, सोज्वळ अशा वात्सल्यमूर्ती आईच्या भूमिका कोट्यवधी रसिकांच्या मनात घर करुन गेल्या म्हणत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देखील सुलोचना दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
सांस्कृतिक महाराष्ट्राचा सालस चेहरा हरपला - विनोद तावडे
सुलोचना दीदी म्हणजे सांस्कृतिक महाराष्ट्राचा सालस चेहरा, त्यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी असल्याचं माजी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी म्हंटलं आहे.मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी साकारलेल्या सोज्वळ भूमिका सर्वांनाच आपल्या घरातील थोरामोठ्यांच्या मायेची आठवण करून देतात, त्यांच्या निधनाने आपल्या कुटुंबातीलच एक ज्येष्ठ आणि मायाळू व्यक्ती हरपल्याची भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे, असं म्हणत माजी मंत्री विनोद तावडे यांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीच्या फार मोठ्या वाटचालीचा शेवट झाला - दिलीप ठाकूर
ज्येष्ठ सिने समीक्षक दिलीप ठाकूर यांनी सुलोचना दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे, यावेळी बोलताना त्यांनी सुलोचना दीदींबद्दल असलेला आदर व्यक्त केला. ते म्हणाले, चित्रपट सृष्टीमध्ये अशा काही महान व्यक्ती झाल्या की ज्यांना पाहताच त्यांचे आशीर्वाद घ्यावे असं वाटतं आणि सुलोचना दीदी त्यातील एक होत्या. अशाच एका महान व्यक्तीचा हा कालखंड फार मोठा होता, सहा दशकांत त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. अगदी छोट्या भूमिकांपासून, नगण्य भूमिकांपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केल्याचं दिलीप ठाकूर म्हणाले. पुढे अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी मोठी वाटचाल केली, जे काही चित्रपटांचे स्वरूप बदललं, भूमिका बदलल्या, व्यक्तिरेखा बदलल्या, भूमिकेच्या पद्धती बदलत आल्या, त्या उल्लेखनीय होत्या आणि अशा मोठ्या कालखंडाचा आज दुर्दैवाने शेवट झाला, असं दिलीप ठाकूर म्हणाले. वाईट, धक्कादायक आणि सांस्कृतिक क्षेत्राची खऱ्या अर्थाने हानी झाल्याचं ते म्हणाले. मराठी चित्रपटसृष्टीच्या फार मोठ्या वाटचालीचा शेवट झाला, असंही पुढे दिलीप ठाकूर यांनी म्हंटलं.
हिंदी सिनेसृष्टी असो किंवा मराठी, त्या आदर्शच होत्या - आशा काळे
अभिनेत्री म्हणून, व्यक्ती म्हणून आणि माणूस म्हणून सुलोचना ताई महान होत्या, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी दिली आहे.सुलोचना ताईंमुळे भालजी पेंढारकर यांच्यासारखे गुरू लाभले आणि मी अभिनेत्री झाले, असं त्या म्हणाल्या. ज्याप्रमाणे जन्मदाती आई आपल्याला जन्म देते, तशा सुलोचना ताई मला आईसारख्या होत्या, त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे आनंद होता आणि सातत्याने मी त्यांच्या मुंबईतील घरी देखील राहिलेली आहे, असं म्हणत आशा काळे यांनी आठवणी जाग्या केल्या. अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टी असो किंवा मराठी चित्रपटसृष्टी, त्या खरोखर आदर्श होत्या, असं आशा काळे यांनी म्हटलं. ममत्व म्हणजे काय, माया, प्रेम, वात्सल्य म्हणजे काय हे सगळं त्यांच्याकडून शिकण्यासारखं असल्याचं त्या म्हणाल्या.
सुलोचना ताईंसोबतचं नातं फार जुनं असल्याचंही पुढे अभिनेत्री आशा काळे म्हणाल्या. सर्व माझ्या जडणघडणीमध्ये सुलोचना दीदींचा फार मोठा वाटा आहे, असंही त्या म्हणाल्या. कधीही वाईट वागणं किंवा वाईट बोलणं किंवा दुसऱ्याचा अनादर आपण करू नये हे समजावून सांगणारी माझी जन्मदाती आई गेली, पण सुलोचना दीदींनी ती कमी भरुन काढली आणि मला माझी आई गेल्यासारखं वाटलं नाही, अशी भावना अभिनेत्री आशा काळे यांनी व्यक्त केली.'मोलकरीण' चित्रपटातील भूमिका आणि 'मराठा तितुका मेळवावा' या चित्रपटातील भूमिका त्यांच्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या होत्या, असंही त्या म्हणाल्या. मुख्य नायिकेच्या भूमिकेत नसल्या तरी त्यांना चित्रपटात पाहताच त्याच मुख्य नायिका असल्यासारखं वाटायचं, इतक्या त्या पडदा व्यापून टाकायच्या. त्यांचा भावलेला गुण म्हणजे नम्रतेचा, असंही अभिनेत्री आशा काळे म्हणाल्या.
चित्रपटसृष्टीतील मोठं व्यक्तिमत्व हरपलं - प्रिया बेर्डे
चित्रपट सृष्टीतील मोठं व्यक्तिमत्व आणि एक मोठी कलाकार अभिनेत्री आज आपल्यातून निघून गेल्याची भावना अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी व्यक्त केली. चांगल्या-वाईट गोष्टींमध्ये धावून येणाऱ्या त्या होत्या आणि अगदी आजीसारखं प्रेम त्यांनी माझ्यावर केल्याचं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. माझ्या कुटुंबामध्ये सुखदुःखाच्या संपूर्ण प्रसंगांमध्ये त्या माझ्यासोबत उभ्या होत्या, त्यांच्या अभिनयाबद्दल तर मी बोलणं फार चुकीचं ठरेल एवढ्या त्या मोठ्या आणि प्रतिभावान, विनम्र होत्या, असं अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी म्हंटलं.
सुलोचना दीदींची जिजाबाई भूमिका कधीच विसरणार नाही - प्रिया बेर्डे
भालजी पेंढारकर यांच्यासोबत सुलोचना दीदींनी खूप काम केलं असून त्यांच्याच 'मराठा तितुका मेळवावा' चित्रपटात त्यांनी जी जिजाबाई साकारली आहे, तशी जिजाबाई साकारलेली कुठलीही अभिनेत्री आजपर्यंत बघितली नसल्याचं प्रिया बेर्डे म्हणाल्या. जिजाबाईंचं व्यक्तिमत्व जे त्यांनी उभं केलं आहे, त्यांचं दिसणं, त्यांचं असणं, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, नऊवारी नेसून ज्या पद्धतीने त्या चालल्या आहेत, जिजाबाई म्हणून केलेलं आईचं प्रतिनिधित्व कधीच विसरू शकणार नाही, ती भूमिका आदर्श असल्याचं प्रिया बेर्डे म्हणाल्या.
प्रत्येक भूमिका त्या जगत गेल्या - उषा नाडकर्णी
सुलोचना ताईंच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीची आई गेली, चित्रपटसृष्टी पोरकी झाल्याचं ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी म्हटलं आहे. त्यांचा अभिनय हा अभिनय नसून त्या प्रत्येक भूमिका जगत गेल्या असल्याचं उषा नाडकर्णींनी म्हंटलं. त्यांचं बोलणं गोड, दिसणं गोड, वागणं गोड, पण त्यांचं जाणं हे खूप दुःखद असल्याचं म्हणत उषा नाडकर्णींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचा:
Sulochana: चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत! ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन