Stranger Things Season 5 : नेटफ्लिक्सची लोकप्रिय वेब सीरिज ‘स्ट्रेंजर थिंग्स’च्या चौथ्या सीझनच्या (Stranger Things Season 4) दुसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर काल (1 जुलै) हा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘स्ट्रेंजर थिंग्स’च्या चौथ्या सीझनचा दुसरा भाग असल्याने ही सीरिज संपेल असे अनेकांना वाटले होते. मात्र, ‘वेक्ना’ अजून जिवंत असून आता त्याचा मृत्यू पाहण्यासाठी आणखी एका सीझनची वाट पाहावी लागणार आहे. आतुरतेने या भागाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांची मात्र निराशा झाली आहे.


‘स्ट्रेंजर थिंग्स’ ही वेब सीरिज प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. या वेब सीरिजचे 4 सीझन आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत, ज्यामध्ये एकूण 34 एपिसोड आहेत. या सीरिजने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. ‘स्ट्रेंजर थिंग्स’ ही एक अमेरिकन ड्रामा सीरिज असून, याची निर्मिती डफर ब्रदर्स नावाच्या प्रॉडक्शन हाऊसने केली आहे. ‘स्ट्रेंजर थिंग्स’ ही सायन्स फिक्शन, हॉरर ड्रामा मालिका आहे. या सीरिजचा पहिला सीझन 15 जुलै 2016 रोजी रिलीज झाला होता. दुसरा सीझन ऑक्टोबर 2017मध्ये आला. तर, तिसरा सीझन जुलै 2019मध्ये रिलीज झाला होता. या नवीन वर्षात सीरिजचा चौथा सीझन दोन भागात विभागून रिलीज झाला आहे.


वेक्ना आणखी ताकदवान होणार?


‘स्ट्रेंजर थिंग्स’ची कथा ही एका लहान मुलांच्या गटाभोवती फिरते. एका लहानमुलांच्या गटावर काही शास्त्रज्ञ विचित्र प्रयोग करत असतात. या प्रयोगामुळे तिथे बंदिस्त असणाऱ्या मुलांमध्ये सुपरपॉवर जागृत होते. यातील एक मुलगी, जिचे नाव ‘इलेव्हन’ आहे, ती शास्त्रज्ञांच्या तावडीतून निसटते आणि शहरातील काही मुलांच्या ग्रुपमध्ये सामील होते. यानंतर त्यांच्यातील एक मुलगा अचानक एका जगातून दुसऱ्या जगात प्रवेश करतो. या अपसाईड डाऊन शहरात सगळ्या गोष्टी तशाच आहेत. मात्र, इथे वास आहे तो दुष्ट शक्तींचा. आपल्या मित्राला सोडवण्यासाठी ही मुलं मोठा लढा देतात आणि त्याला वाचवतात. मात्र, यात ते बरंच काही गमावतात. यातच पहिले तीन सीझन संपतात.


चौथ्या सीझनमध्ये त्यांचा सामना होतो दुष्ट प्रवृत्तीच्या मुख्य कारणाशी... डेमोगोर्गेनचा कर्ताधर्ता असणारा ‘वेक्ना’ या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळतो. इलेव्हनसोबत कैदेत असणारा हेन्री नावाचा मुलगा त्याच्यातील दुष्ट शक्तींमुळे ‘वेक्ना’ बनतो आणि दुसऱ्या जगातून तो पृथ्वीवर राज्य करण्याची स्वप्न बगःत आहे. त्याला मनात दुष्ट विचार असणाऱ्या लोकांचा राग आहे. अशा लोकांना मारून तो आपला बदल घेत आहे. मात्र, आता इलेव्हन पुन्हा एकदा त्याच्यासोबत लढण्यासाठी सज्ज झाली. या लढाईत देखील त्यांनी काही लोकांना गमावलं, तर काही लोक परतून आले. शेवट ‘वेक्ना’ मरणार असं वाटत असतानाचा खेळ पालटतो आणि वेक्ना जखमी होऊन निघून जातो. आता तो पुन्हा एकदा त्याच्या संपूर्ण ताकदीनिशी परतणार आहे. यावेळी तो आणखी गोष्टी उध्वस्त करणार आहे. याची झलक सीरिजच्या शेवटच्या भागात पाहायला मिळते. मात्र, इथेच एपिसोड संपल्याने आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना पाचव्या सीझनची वाट पाहावी लागणार आहे.


कधी येणार ‘स्ट्रेंजर थिंग्स 5’?


फेब्रुवारी महिन्यातच या सीरिजच्या पाचव्या सीझनची घोषणा करण्यात आली होती. या सीरिजचे मेकर्स डफर ब्रदर्स पुढचा सीझन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तसेच, पाचवा सीझन हा शेवटचा सीझन असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. मात्र, या सीझनसाठी प्रेक्षकांना बरीच वाट पाहावी लागणार आहे. ‘स्ट्रेंजर थिंग्स 5’ दोन वर्षांनी म्हणजेच 2024मध्ये रिलीज होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.   


हेही वाचा :


Stranger Things : 'स्ट्रेंजर थिंग्स'च्या चौथ्या सीझनला प्रेक्षकांची पसंती; आता प्रतीक्षा Vol. 2 ची


Netflix : नेटफ्लिक्सच्या 'या' वेब सीरिजची प्रेक्षकांमध्ये चर्चा; पाहा यादी