South Cinema Actor Mayur Patel Arrested: मनोरंजन विश्वातून (Entertainment News) एक हादरवणारी घटना समोर आली आहे. कर्नाटकाची (Karnataka Film Industry) राजधानी बंगळुरूमध्ये (Bengaluru) घडलेल्या प्रकारानं सर्वचजण पुरते हादरुन गेले आहेत. पोलिसांनी मद्यपान करुन भरधाव गाडी पळवणं, बेदरकारपणे रस्त्यावर गाडी चालवून इतर वाहनांना धडकल्याप्रकरणी सुप्रसिद्ध अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बंगळुरूच्या ओल्ड एअरपोर्टवर झालेल्या भीषण अपघातानंतर करण्यात आली आहे.
पोलिसांनी कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध (चंदन) अभिनेता मयूर पटेल याच्याविरुद्ध मद्यपान करून गाडी चालवल्याबद्दल आणि बेपर्वा गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल ओल्ड एअरपोर्ट रोडवर त्याची वेगानं जाणारी फॉर्च्युनर कार चालवत असताना ही घटना घडली. नियंत्रण सुटल्यानं त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यामुळे जवळपासची इतर वाहनं एकमेकांवर आदळली. या अपघातात एकूण चार वाहनांचा चक्काचूर झाला असून मोठं नुकसान झालं आहे. सुदैवानं, या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, तसेच कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. पण, सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे.
पोलिसांकडून अटकेची कारवाई
अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अभिनेता मयूर पटेलला ताब्यात घेतलं. त्याची ब्रेथअलायझर चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये तो दारूच्या नशेत असल्याची पुष्टी झाली. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत अभिनेत्याची आलिशान फॉर्च्युनर कार जप्त केली आणि संबंधित कायदेशीर कलमांखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, घटनेची सखोल चौकशी केली जात आहे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं.
दरम्यान, सुप्रसिद्ध अभिनेता मयूर पटेलबाबत सांगायचं झालं तर, कन्नड सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि संगीत दिग्दर्शक मदन पटेल यांचा तो मुलगा आहे. मयूरनं 2000 मध्ये सिनेसृष्टीत प्रवेश केला. जरी त्याला त्याच्या सुरुवातीच्या काळात संघर्ष करावा लागला, तरी त्यानं 'गुन्ना' आणि 'स्लम' यांसारख्या सिनेमांमधून स्वतःला सिनेसृष्टीत प्रस्थापित केलं. 'बिग बॉस कन्नड'मध्ये सहभागी झाल्यानंतर मयूर पटेलची लोकप्रियता गगनाला भिडली. या रिअॅलिटी शोमुळे तो घराघरात पोहोचला आणि त्याचे चाहते वाढले. दरम्यान, या कायदेशीर वादामुळे आता त्याच्या कारकिर्दीवर आणि प्रसिद्धीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
