South Cinema : आपण आज अशा अभिनेत्रीबाबत जाणून घेणार आहोत, जिने जवळपास सर्व टॉप हिरोंसोबत सिनेमात काम केले आहे. तब्बल 1500 हून अधिक चित्रपटांत त्या झळकल्या. याशिवाय 6000 पेक्षा जास्त नाटकांत त्यांनी अभिनय केला. लहान वयातच आजी-आजोबांच्या भूमिका साकारून प्रेक्षकांना भावलेल्या या अभिनेत्रीला आजही त्यांच्या मूळगावी कुलदेवीप्रमाणे पूजलं जातं. आपण ज्यांच्याविषयी बोलत आहोत त्या म्हणजे एस. एन. लक्ष्मी....

एस. एन. लक्ष्मी यांचा जन्म 1927 साली विरुधुनगर जिल्ह्यातील अरुप्पुकोट्टई जवळील गावात झाला. त्या 13 भावंडांत सर्वांत धाकट्या होत्या. त्यांच्या जन्मापूर्वी वडील राजा कंबलथु  प्रशासकीय विभागात नोकरी करत होते. मात्र लक्ष्मी यांच्या जन्मानंतर वडिलांची नोकरी गेली. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आणि लवकरच वडिलांचे निधन झाले. आईला 13 मुलांचे पोट भरणे शक्य होत नव्हते. त्या वेगवेगळे छोटे-मोठे काम करून कसाबसा संसार चालवत होत्या. अशा वेळी केवळ सहा वर्षांची असतानाच लक्ष्मी नाट्यकंपनीसोबत राहू लागल्या आणि घर सोडले.

नाटकांत काम करून त्यांनी अभिनयाची कला अधिक प्रगल्भ केली. 1948 मध्ये प्रदर्शित झालेल्या चंद्रलेखा चित्रपटात नृत्यकलेच्या तुकडीत त्यांनी काम केले. डॉक्टर सावित्री, नल्ला थंगई, थामराई कुलम, अवना इवन यांसारख्या अनेक चित्रपटांत त्या दिसल्या. मात्र त्यांनी कधीच लग्न केले नाही आणि पूर्ण आयुष्य फक्त अभिनयालाच वाहून घेतले.

बगदाद थीफ या चित्रपटात त्यांनी एम. जी. रामचंद्रन यांच्यासोबत काम केले. शिवाजी गणेशन, जेमिनी गणेशन, एस. एस. राजेंद्रन, मुथुरामन यांसारख्या दिग्गजांसोबतही त्या झळकल्या. सर्वर सुंदर या चित्रपटात नागेश यांच्या आईची भूमिका त्यांनी साकारली. रजनीकांतच्या एजामान, कमल हासनसोबत तेवर मगन, मायकेल मदन कामराजन, विजयकांतसोबत वाणत्ताई पोल, महा नदी, अजितसोबत मायनर मापिल्लई, विजयसोबत फ्रेंड्स, विरुमांडी यांसारख्या अनेक चित्रपटांत त्या झळकल्या.

महा नदी या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळणार होता, पण केवळ एका मताने तो हुकला. आयुष्यभर असंख्य चित्रपटांत काम केलेल्या एस. एन. लक्ष्मी यांचे 2012 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मूळगाव चेननेल्कुडी येथे स्वतःच्या शेतात त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिथे त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक स्मारक बांधण्यात आले आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला त्यांचे कुटुंबीय त्यांची कुलदेवीप्रमाणे पूजा करतात.

कमल हासन यांनी त्यांना सतत चित्रपटांत काम दिले. त्यामुळेच या पिढीला त्यांचा अभिनय पाहता आला. कोणत्याही भूमिकेत सहजतेने शिरणाऱ्या एस. एन. लक्ष्मी या तमिळ सिनेमातील अंडररेटेड अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. चेन्नईच्या सालीग्रामम भागात त्या आपल्या भावाच्या मुलांबरोबर व नातवंडांबरोबर राहात होत्या. शरीरात ताकद असेपर्यंत त्या स्वतः गाडी चालवत असत.

लहानपणापासून दारिद्र्यात वाढलेल्या एस. एन. लक्ष्मी यांनी सिनेमाच्या माध्यमातून गरिबीच्या दलदलीतून स्वतःला बाहेर काढले. कुटुंबाची काळजी घेण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लग्न केले नाही. सिनेमातून मिळालेली सर्व संपत्ती त्यांनी स्वतःचे पालनपोषण करणाऱ्यांना दान केली. गावातील 10 एकरांहून अधिक मळा व घरासह इतर संपत्तीही त्यांनी दान केली. गावकरी सांगतात की त्यांनी 20 पेक्षा जास्त अनाथालयांना मदत केली. मात्र याबाबत ठोस पुरावा मिळालेला नाही.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या

एलिझाबेथ एकादशीमधील गोंडस चिमुकला आता झालाय 23 वर्षांचा, अभिनयापासून दूर; कोणत्या क्षेत्रात काम करतोय?