Prakash Raj on Pawan Kalyan : तेलुगू चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार आणि आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची फिल्म ‘हरि हरा वीरा मल्लू’ 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत आहेत. ही पॅन इंडिया फिल्म अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती. पवन कल्याण सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून, त्याचबरोबर सरकारी कामांमध्येही ते सहभागी नोंदवत आहेत. या दरम्यान त्यांनी हिंदी भाषा वादावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी दक्षिण भारतीयांना हिंदी शिकण्याचे महत्त्व समजावून सांगितले. मात्र, अभिनेते प्रकाश राज यांना पवन यांचे हे वक्तव्य खटकले. त्यांनी पवन कल्याण यांचे हे भाष्य लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.
प्रकाश राज यांनी पवन कल्याण यांचा एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये ते लोकांना हिंदी बोलण्याचे महत्त्व सांगत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत प्रकाश राज यांनी लिहिले, “कशाच्या मोबदल्यात स्वतःला विकलं? किती लाजिरवाणं! #JustAsking.” प्रकाश राज यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांच्यावर टीका केली.
एका युजरने प्रकाश राज यांच्या पोस्टवर लिहिले, “प्रकाश, तुम्ही मग हिंदी चित्रपटांमध्ये काम करू नका.” दुसऱ्या युजरने लिहिलं, “तुम्ही हिंदी चित्रपटांमध्ये काम का करता? तुम्हाला हिंदी आवडत नसेल, तरी का? #JustAsking.” तर एका युजरने पवन कल्याण यांना पाठिंबा देत लिहिलं, “पवन कल्याण यांनी असं कुठेही म्हटलं नाही की प्रत्येकाने हिंदी शिकलीच पाहिजे. त्यांनी फक्त इतकंच सांगितलं की हिंदी शिकणं आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. आपल्या देशात ही भाषा 50 टक्क्यांहून अधिक भागांमध्ये बोलली जाते. उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्मावर टीका केली तेव्हा तुम्ही कुठे होतात?”
पवन कल्याण यांनी हिंदीला देशाच्या एकात्मतेचा मार्ग म्हटलं
व्हिडीओमध्ये पवन कल्याण म्हणतात, “तेलुगू ही आपली मातृभाषा असू शकते, पण आपली राष्ट्रीय भाषा हिंदी आहे. आपण घरी तेलुगू बोलतो, पण घराबाहेर गेल्यावर आपल्याकडे हिंदी असते. आज जग विविधतेत फूट पाडण्याचा मार्ग शोधत आहे, पण आपण एक देश म्हणून हिंदीच्या माध्यमातून एकत्र येण्याचा मार्ग शोधतो आहोत.”
पवन कल्याण यांनी हिंदीला तेलुगूची मोठी बहीण म्हटलं
पुढे ते म्हणतात, “मी अशा प्रत्येक भाषेचं स्वागत करतो. मग त्या द्रविड भाषा असोत, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम किंवा आपल्या देशातील इतर कोणतीही भाषा. आपल्याला आपल्या मातृभाषेचा सन्मान करायलाच हवा. जर ती आपली आई असेल, तर हिंदी ही आपली पेदम्मा (आईची मोठी बहीण) आहे. शिक्षण, व्यापार किंवा नोकरीमध्ये कोणतीही प्रगती करायची असेल, तर भाषेच्या अडथळ्यांना पार करावंच लागेल. अशा वेळी आपण हिंदीचा विरोध करून प्रगती रोखतो. हिंदी शिकणं म्हणजे स्वतःला गमावणं नाही, तर स्वतःला अधिक बळकट करणं आहे.”
इतर महत्त्वाच्या बातम्या