actress sai pallavi : अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) दाक्षिणात्य सिनेक्षेत्रातील (Tollywood) एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र, अनेकांना माहिती नसेल, पण अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी साईने एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं होतं. 'नॅचरल ब्यूटी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या साईने (Sai Pallavi) फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीसाठी मिळालेली कोट्यवधींची ऑफर नाकारली होती. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडली आहे.
फेअरनेस क्रीमच्या कोट्यावधींच्या जाहिरातीवर लाथ मारली
साई पल्लवीला 2019 साली एका कंपनीकडून फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीसाठी 2 ते 3 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मात्र, साईने ती जाहिरात नाकारली. तिचं स्पष्ट मत होतं की, ती अशा गोष्टींचं प्रमोशन करणार नाही. एका मुलाखतीत तिने सांगितले की, ती खूप मेकअप करण्याच्या बाजूने नाही. ती भारतीय आहे आणि आपल्याला जो रंग मिळाला आहे, तोच योग्य आहे. तिच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक झालं होतं.
स्पष्टवक्तेपणामुळे वादातही सापडली होती साई पल्लवी
साई पल्लवीच्या अभिनय कौशल्याची, सौंदर्याची आणि साधेपणाची सर्वत्र प्रशंसा होते. मात्र, तिच्या बेधडक मतांमुळे ती अनेकदा वादात सापडली आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाबद्दल भाष्य केले. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्यांची तिने गोरक्षकांद्वारे मुस्लिम तरुणांना मारहाण करण्यात आलेल्या घटनेशी तुलना केली होती.
काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर मत
साई पल्लवी म्हणाली होती की, ‘द काश्मीर फाइल्स’ मध्ये दाखवले आहे की काश्मिरी पंडितांना कसे मारण्यात आले. यासोबतच तिने एक प्रसंग सांगितला ज्यात एका मुस्लिम तरुणाने गाडीमध्ये गाय ठेवली होती आणि त्याला मारहाण करत ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्यायला लावल्या गेल्या. ती म्हणाली की, जर धर्मीय संघर्षाबद्दल बोलायचं असेल, तर या दोन्ही घटनांमध्ये फरक काय? तिच्या मते, काश्मिरी पंडितांचा नरसंहार तेव्हा झाला आणि ही घटना आता घडली. आपण स्वतः योग्य असलो तरच योग्यतेसाठी आवाज उठवू शकतो.
सिनेमा कारकीर्द
साई पल्लवीने 2005 साली ‘कस्तुरी मान’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर तिने काली, मिडल क्लास, मारी, लव्ह स्टोरी, श्याम सिंह रॉय, गार्गी, अमरन, आणि तंडेल या चित्रपटांमध्ये अभिनय केला.
साई पल्लवीचे आगामी प्रोजेक्ट्स
साई लवकरच नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती माता सीतेच्या भूमिकेत दिसेल, तर रणबीर कपूर भगवान रामाची भूमिका साकारेल. ‘केजीएफ’ फेम यश लंकेच्या रावणाच्या भूमिकेत झळकणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
