मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सुरू होता होता मनोरंजनसृष्टी थांबली. एप्रिलच्या 30 तारखेला सूर्यवंशी (Sooryavanshi )प्रदर्शित होणार होता. हा चित्रपट प्रदर्शित झाला की इतर चित्रपट आपआपल्या तारखा ठरवणार होते. पण कोरोनाची दुसरी लाट आली आणि सगळं थांबलं. आता ही दुसरी लाट जाऊन पुन्हा गोष्टी पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. मनोरंजनसृष्टीही त्याला अपवाद नाही. म्हणून सूर्यवंशी चित्रपटानेही आपली चाचपणी चालू केली आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी (Sooryavanshi )या चित्रपटाकडून मनोरंजनसृष्टीला मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट बंद पडलेल्या थिएटर्सचं.. त्या संपूर्ण व्यवस्थेचं अर्थचक्र पूर्वपदावर आणेल याची खात्री हिंदी इंडस्ट्रीला वाटते. म्हणूनच अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेल्या सूर्यवंशीची तारीख काय ठरते याकडे अनेकांचं लक्ष आहे. सूर्यवंशीच्या निर्मात्यांनीही चाचपणी करू एक तारीख निश्चित केली आहे, ती आहे 13 ऑगस्ट. स्वातंत्र्यदिनाच्या आजूबाजूला येणारा शुक्रवार धरण्याकडे या सिनेमाचा कल आहे. त्यानुसार 13 ऑगस्टवर सूर्यवंशीची नजर स्थिरावली आहे. ही तारीख निश्चित झाल्यानंतर आता थिएटरमालक, एग्झिबिटर्स, मल्टिप्लेक्सेस यांच्याशी बोलणी सुरू झाली आहेत. पण आता थिएटरबाबत सूर्यवंशीच्या निर्मात्यांनी जी भूमिका घेतली आहे त्यावरून नवी गोची तयार झाली आहे.
नॅशनल थिएटर्स चेन यात आयनॉक्स, सिनेपोलीस आणि पीव्हीआर यांचा समावेश होतो. या चेन्समध्ये आणि निर्मात्यांमध्ये सध्या वाटाघाटी चालू आहेत. एका जुन्या एग्झिबिटरने नाव न सांगण्याच्या अटीवर याबद्दल माहीती दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना तो म्हणाला, हिंदीतले मोठे सिनेमे टक्केवारीमध्ये सिनेमे देतात. असोसिएशनने ठरवून दिल्यानुसार सिनेमा रिलीज झालेल्या पहिल्या आठवड्यात जेवढं कलेक्शन होईल त्याची 50 टक्के रक्कम निर्मात्यांना द्यावी लागते. दुसऱ्या आठवड्यात एकूण कलेक्शनच्या 40 टक्के रक्कम निर्मात्यांना देणं थिएटरला बंधनकारक असतं. तर तिसऱ्या आठवड्यात 30 टक्के रक्कम निर्मात्यांना द्यावी लागते. अशी ही तीन आठवड्यांची 50-40-30 टक्केवारी असते. आता सूर्यवंशीने ही टक्केवारी 60-50-40 करण्याची मागणी केली आहे. जी या थिएटर्स चेनला मंजूर नाही. त्यावर सध्या वाटाघाटी चालू आहेत.
बऱ्याच काळानंतर एक मोठा सिनेमा येत असल्यामुळे इतर थिएटर्सनी निर्मात्यांची ही मागणी मान्य केली आहे. कारण, सध्या गेल्या अनेक महिन्यांपासून थिएटर्स यथातथाच चालू आहेत. सूर्यवंशीच्या निमित्ताने पुन्हा अर्थचक्र सुरू होईल असा विश्वास या थिएटर्सना वाटतोय. त्यामुळे ते म्हणतील तसं करण्याकडे काहींचा कल आहे. मात्र नॅशनल थिएटर चेन मात्र असोसिएशनने घालून दिलेल्या नियमांवर ठाम आहे. सध्या रोहित शेट्टीही खतरोंके खिलाडीसाठी दक्षिण अफ्रिकेत आहे. तो आल्यानंतर या सर्व घडामोडींना वेग येईल असंही त्याने सांगितलं.