Sonu Sood On Kangana Ranaut: भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर (CJP Protest) बोचरी टीका करत त्यांना 'गटारछाप पिढी' म्हटलं. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात एकाच ठिकाणी इतका कुरूप उथळ आणि असभ्य प्रकार कधीही पाहिला नाही, असेही ते म्हणाली. कंगनाच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना अभिनेता सोनू सूदने कंगनाला फटकारलंय. कंगना रणौतने असे वक्तव्य केले असेल तर ते अत्यंत चुकीचे आणि लाज आणणारे असल्याचं सोनू सूद (Sonu Sood) म्हणाला. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अभिनेता सोनू सूद शिर्डीमध्ये साईंच्या दर्शनासाठी आला होता .
काय म्हणाला सोनू सूद?
सोनू सूद म्हणाला,' मी कंगना रणौतचं वक्तव्य ऐकलं नाही. त्या असं म्हणाले असतील तर ते लाजिरवाणं आहे. असं बोलायला नको होतं. मात्र हेच युवा एखाद्याला अभिनेता बनवतात.त्यामुळे युवक बरोबर असतील तरच तुम्ही राहाल.अन्यथा खूप त्रास होऊ शकतो. तुम्ही ॲक्टर असाल किंवा डॉक्टर, जोपर्यंत जनता तुमच्याबरोबर आहे तोपर्यंतच तुमचे अस्तित्व. तुम्ही विचार करून बोलायला पाहिजे. कारण शेवटी जनता देवाचं दुसरं रूप आहे.' असं म्हणत सोनू सूदने कंगना रणौतच्या वक्तव्याला फटकारलं.
युवकांचा दिल्ली आंदोलनाला पाठिंबा देत सोनू सूद म्हणाला 'युवक देशाचे भविष्य आहे.त्यांचे ऐकले पाहिजे.त्यांना साथ दिली पाहिजे.मात्र आंदोलन करताना मुद्दे भरकटवण्यासाठी काही एलिमेंट येतात.त्यांच्यापासून वाचले पाहिजे.सरकार देखील देशाच्या चांगल्यासाठी काम करते, मात्र युवकांशी जोडले जाणे गरजेचे असल्याचं सोनू नमूद केलं. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सोनू सूद साई दर्शनासाठी शिर्डीत उपस्थित होता. त्यावेळी दिलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अनेक विषयांवर त्याने प्रतिक्रिया दिली.
कंगना रणौत नेमकं काय म्हणाली होती?
दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनात सहभागी झालेल्या Gen Z तरुणांच्या भाषेवर आणि वर्तनावर कंगनाने आक्षेप घेत त्यांना 'गटारछाप' म्हटले आहे. भारत हा सुसंस्कृत लोकांचा देश आहे. तुम्ही स्वतःला 'कॉकरोच' म्हणता आणि त्यांच्यासारखेच वागता. तुम्ही जगासमोर फक्त घाण आणि विद्रूपता मांडत आहात, असे म्हणत तिने "यांना जन्म कोण देतंय? असा संतप्त सवालही कंगना रणौतने केला. या आंदोलनाचे व्हिडीओ पाहून मानसिक धक्का बसल्यामुळे आता स्वतःला सावरण्यासाठी आपल्याला 'डिजिटल डिटॉक्स'ची (सोशल मीडियापासून दूर राहण्याची) गरज असल्याचंही कंगना म्हणाली. तसेच समाजाला देण्यासारखं त्यांच्याकडे काहीही मोलाचं नसतं. तरीही, ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेकांसोबत लैंगिक संबंध ठेवणं या गोष्टींमधील आपल्या स्वातंत्र्याचं ते अभिमानानं प्रदर्शन करतात, अशी टीकाही कंगना रणौतने केली.
