Sonalee Kulkarni :  मराठी सिनेसृष्टीत आपले वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सध्या चर्चेत आहे. सोनाली सध्या दाक्षिणात्य चित्रपटात काम करत आहे. अभिनयासोबत आपल्या सडेतोड मतांसाठी सोनाली चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा तिने सडेतोड भाष्य केले आहे. एखाद्या पुरुष कलाकाराने यश मिळवले की त्याची मेहनत आहे असे म्हणतात. मात्र, स्त्रीचे हे यश हे नेहमी इतरांचे उपकार असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सोनाली कुलकर्णीने म्हटले. 


सोनाली कुलकर्णी ही मल्याळम चित्रपट 'मलायकोट्टाई वालीबान'या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात  दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल (Mohal Lal) प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णीने 'नवभारत टाइम्स'सोबत संवाद साधला. त्यावेळी तिने आपली सडेतोड मते व्यक्त केली.






महिलांनाही त्यांच्या मेहनतीचे श्रेय द्या...


सोनालीने एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, जेव्हा एक मुलगी स्वत: घर, कार खरेदी करते किंवा ती एखादी गोष्ट आपल्या मेहनतीने साध्य करते तेव्हा तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. एखाद्या राजकारण्याने भेट दिली असेल, एखाद्या निर्मात्याने ती दिली असेल, कदाचित ती विशेषाधिकाराने मिळाली असेल म्हटले जाते. महिलांबद्दल असा विचार का? असा सवाल सोनालीने केला. मला ही मानसिकता फार वाईट वाटते की जेव्हा एखादी स्त्री मिळवते तेव्हा तिला विशेषाधिकार म्हणतात आणि जेव्हा तोच पुरुष मिळवतो तेव्हा ते त्याचे यश असल्याचे म्हटले जाते. महिला सुद्धा स्वतःहून यश मिळवू शकतात. त्याच्या मेहनतीचे श्रेय त्याला द्यायला हवे, असेही सोनालीने म्हटले. 


कधीच तडजोड केली नाही... 


सोनाली कुलकर्णीने म्हटले की, माझ्या वैयक्तिक आयुष्यात आणि करिअरमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही. मी कधीही मानसिक, भावनिक किंवा शारीरिक तडजोड केली नाही. मी माझ्या कारकिर्दीत जे काही थोडेफार यश मिळवले आहे ते मी माझ्या बळावर, माझ्या अटींवर मिळवले असल्याचे सोनालीने म्हटले. माझे मूल्य जपत केले आहे. माझ्या आयुष्याच्या शेवटी, जेव्हा मी माझ्या नातवंडांना माझी गोष्ट सांगेन, तेव्हा मी अभिमानाने म्हणू शकतो की ती मी कमावली आहे. कोणतीही तडजोड केली नसल्याचे तिने सांगितले.