मुंबई : अभिनेता तसेच निर्माता अरबाज खान, सोहेल खानसह सोहेलचा मुलगा निर्वाण खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेकडून या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई एअरपोर्टवर बीएमसीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप या तिघांवर आहे. 25 तारखेला हे तिघे यूएईवरुन मुंबई आले होते. त्यावेळी या तिघांनी एअरपोर्टवरील हॉटेल ताज लॅंडसएंडमध्ये क्वारंटाईन होण्याचं सांगितलं होतं, मात्र हे तिघेही तसं सांगून घरी निघून गेले.

Continues below advertisement

मुंबई पोलिस प्रवक्ता DCP चैतन्य एस यांनी सांगितलं की, सोहेल, अरबाज आणि निर्वाण खान विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितलं होतं, मात्र त्यांनी तसं न करता ते घरी गेले. त्यामुळं त्यांच्या विरोधात खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. अरबाज आणि सोहेलला चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं, अशी माहिती आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमानुसार ब्रिटन व यूएईवरून आलेल्या प्रवाशांता सात दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात राहावं लागतं. त्यानुसार त्यांचं बुकींग हे ताज लॅण्डमध्ये करण्यात आलं होतं. त्यानुसार 26 डिसेंबर रोजी महापालिकेने जेव्हा आढावा घेतला, तेव्हा ते तिघे तिथं गेलेच नसल्याचं समोर आलं. हे तिघे परस्पर घरी गेल्याचं उघडकीस आलं होतं. त्यामुळे आता मुंबई महापालिकेकडून त्यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement

विमानतळावरून नियमांचा भंग करून परस्पर घरी पळून गेल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. याप्रकरणी आता या तिघांना भायखळातील क्वारंटाईन सेंटरला सुद्धा नेण्यात येणार आहे. 9 जानेवारीपर्यंत त्यांना तिथं ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणुमुळे राज्यात अधिक दक्षता जात असली तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले.