Sneha Wagh Decline To Work In Marathi Serial: सिनेसृष्टी किंवा टेलिव्हिजन इंडस्ट्रीत (Television Industry) नाव कमावण्याचं स्वप्न घेऊन अनेकजण येतात. काहीचं हे स्वप्न पूर्ण होतं, तर काहींना मात्र फार झगडावं लागतं. अनेक कलाकार असेही आहेत, जे मराठीतून (Marathi Serials) सुरुवात करतात खरी, पण त्यानंतर मात्र इतर भाषांमध्ये संधी मिळाली की, तिथे वळतात. मराठी टेलिव्हिजन विश्वातून अनेक कलाकार हिंदी टेलिव्हिजन विश्वात गेले. त्यापैकी काहींना लोकप्रियता मिळाली, पण काहींना परतीची वाट धरावी लागली. अनेकांचा चांगला जम बसला. यापैकीच एक नाव म्हणजे, स्नेहा वाघ.
बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये दिसलेली मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) स्नेहा वाघनं (Sneha Wagh) मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. पण, त्यासोबतच तिनं हिंदीतही भरपूर काम केलं. काही दिवसांपूर्वी स्नेहा वाघनं राजश्री मराठीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत बोलताना तिनं आपल्या स्ट्रगलिंग दिवसांपासून ते अगदी आतापर्यंत बऱ्याच गोष्टींबाबत सांगितलं.
मराठी अभिनेत्री स्नेहा वाघ नेमकं काय म्हणाली?
अधुरी एक कहाणी, या गोजिरवाण्या घरात या सुपरहिट मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री स्नेहा वाघ हिनं मराठीसोबतच हिंदीमध्येही भरपूर काम केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना स्नेहा वाघ म्हणाली की, "एक व्यावसायिक कलाकार म्हणून मला फारसा संघर्ष करावा लागला नाही. सुरुवातीला मी नवीन होते त्यामुळे शिकावं लागलं कारण माझ्या घरची पार्श्वभूमी अभिनयाची नव्हती. मी शिकले, पुढे गेले, जसं चांगलं काम येत गेलं तसं मी करत गेले. माझ्या खासगी आयुष्यात बरेच चढ-उतार होते. पण माझ्यामते मी ते दिवस पाहिले म्हणून अनुभवातून घडले..."
टेलिव्हिजनवर काम करायला आवडेल, पण मराठीत नाही : स्नेहा वाघ
"मला टेलिव्हिजनवर काम करायला आवडेल, पण आता मराठी मालिका मी करू शकत नाही कारण माझी भाषा थोडी बदलली आहे. मी जेव्हा हिंदी मध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा माझी भाषा ऐकून माझ्या दिग्दर्शकांनी त्यांच्याकडील छडीने मारलं होतं. तुझी भाषा मराठी नाही हिंदी नाही कोणती भाषा आहे असं विचारलं होतं.", असं स्नेहा वाघ म्हणाली.
पुढे बोलताना स्नेहा वाघ म्हणाली की, "तेव्हा ते मला म्हणाले की, तू ज्या भाषेत विचार करशील ती तुझी भाषा चांगली होईल, त्यामुळे जर तुमची भाषा चांगली व्हायला हवी असेल तर, तुम्ही त्या भाषेत विचार करायला पाहिजे. त्यामुळे माझ्या भाषेत बदल झाले, मी फिल्म मेकिंगसाठी लंडनमध्ये गेले होते. त्यामुळे मी ते एक वेगळं विश्व बघितलं. आता मी वृंदावनला राहत असल्यामुळे मला ब्रजभाषा यायला लागली आहे..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :