Smita Patil Profile Story : बॉलिवूडच्या 100 वर्षांच्या इतिहासात अनेक अभिनेत्रींनी नाव कमावलं. सिनेक्षेत्रात घरातील पार्श्वभूमी असेल तर करिअर करणे सोपं जातं, असं म्हटलं जातं. मात्र, कोणतीही पार्श्वभूमी नसताना शून्यातून नाव कमावणाऱ्या अभिनेत्री बोटावर मोजण्याइतक्या आहेत. काही मोजक्या अभिनेत्रींनी अशी छाप टाकली की त्यांना पिढ्यानपिढ्या विसरता येणार नाही. आज आपण मुंबईतील राजकारणी शिवाजीराव पाटील आणि समाजसेविका विद्याताई पाटील यांच्या कन्या अभिनेत्री स्मिता पाटील याच्याबाबत बोलतोय.
समांतर सिनेमाची ओळख – स्मिता पाटील
अभिनेत्री स्मिता पाटील यांनी सिनेक्षेत्रात येऊन सौंदर्याची व्याख्याच बदलली होती. स्मिता पाटील यांनी केवळ 11 वर्षांच्या करिअरमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांनाच थक्क केलं. त्या पॅरेलल सिनेमाचा चेहरा बनल्या होत्या. मंथन, मंडी, बाजार, अर्थ, सत्य, निशांत आणि भूमिका अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. नंतरच्या काळात त्या बॉलिवूडसह मराठीतील सर्वोत्तम अभिनेत्रींमध्ये गणल्या गेल्या. मंथन,भूमिका, आक्रोश, अर्थ, अर्ध्य सत्य, बाजार या सिनेमातील भूमिकांमुळे त्या घराघरात पोहोचल्या.
डीडी नॅशनलमध्ये न्यूज रीडर म्हणून सुरुवात
स्मिता पाटील यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शालेय नाट्यप्रयोगांत त्या भाग घेत असत आणि पुढे जाऊन त्या थिएटर कलाकार झाल्या. मुंबई विद्यापीठातून साहित्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी डीडी नॅशनलमध्ये न्यूज रीडर म्हणून काम सुरु केलं. त्या मुंबईतील बातम्या वाचत असत. असं म्हटलं जातं की, स्मितांना साडी घालणं अजिबात आवडत नव्हतं. पण त्या काळात डीडी नॅशनलमध्ये न्यूज वाचकांना साडी घालणं बंधनकारक होतं. त्यामुळे त्या जीन्सवर साडी नेसत असत.
स्मिता जेव्हा डीडी नॅशनलवर न्यूज वाचिका म्हणून काम करत होत्या, तेव्हा प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या नंजर त्यांच्यावर पडली. त्यांनीच स्मितांना चरणदास चोर या बालचित्रपटातून लॉन्च केलं. त्यानंतर मंथन या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली आणि त्या घराघरात पोहोचल्या. त्याचवेळी त्यांना तीव्र माध्यम हा चित्रपटही मिळाला. श्याम बेनेगल स्मितांच्या सावळ्या रंगावर आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वावर इतके भारावले होते की एका मुलाखतीत त्यांनी स्मितांची खूप प्रशंसा केली होती.
समांतर सिनेमासाठी टाळल्या व्यावसायिक चित्रपट
स्मिता पाटील यांनी अनेक स्त्री-केंद्रित चित्रपटांमध्ये काम करून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्या समांतर सिनेमाच्या सुपरस्टार होत्या. त्यांनी व्यावसायिक चित्रपटांच्या अनेक ऑफर फेटाळून लावले. मात्र 80 च्या दशकात त्यांनी काही व्यावसायिक चित्रपटातही काम केलं. अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा नमक हलाल हा त्यांचा हिट चित्रपट होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या