Badshah Bishnoi Gang Threat: बॉलीवूडमधील प्रसिद्ध सिंगर आणि रॅपर बादशाह पुन्हा एकदा वादात सापडला आहे. हरियाणा पोलिसांकडून कारवाईची शक्यता व्यक्त होत असतानाच आता कुख्यात गँगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या गँगकडून बादशाहला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमधून ही धमकी देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, हरियाणातील पानिपत येथे झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेताना बिश्नोई गँगने ही धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. (Badshah)

Continues below advertisement

पानिपतमधील गोळीबाराची जबाबदारी घेतली

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील पानिपत येथे झालेल्या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. या प्रकरणात गँगकडून एक नोट जारी करण्यात आली. त्यामध्ये असंध रोड, पानिपत येथील वेस्टर्न युनियन (हवाला व्यवहाराशी संबंधित) ऑफिसवर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी रंदीप मलिक आणि अनिल पंडित (USA) यांनी घेतल्याचे म्हटले आहे.

पोस्टमध्ये असा आरोप करण्यात आला की, संबंधित लोक हवाला व्यवहारांद्वारे देशातील पैसा परदेशात पाठवत होते आणि त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान होत होते. या लोकांना आधी फोन करून इशारा दिला होता, मात्र त्यांनी तो गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे आजची घटना ही फक्त ‘ट्रेलर’ असून पुढे अजून मोठी कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. याच पोस्टमध्ये सिंगर बादशाहलाही थेट धमकी देण्यात आली आहे. “सिंगर बादशाह, तू हरियाणाची संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न केला आहेस. 2024 मध्ये तुझ्या क्लबमध्ये तुला ट्रेलर दाखवला होता. पुढच्या वेळी थेट तुझ्या कपाळावर गोळी मारू,” असा इशारा पोस्टमध्ये देण्यात आला आहे.

Continues below advertisement

‘टटीरी’ गाण्यावरून आधीच वाद

दरम्यान, बादशाह सध्या हरियाणवी गाणे ‘टटीरी’मुळे वादाच्या भोवऱ्यात आहे. या प्रकरणात  हरियाणा राज्य  महिला आयोगने कडक भूमिका घेतली आहे. आयोगाने पोलिसांना आदेश दिले आहेत की, चौकशीसाठी बादशाह सहकार्य करत नसल्यास त्याला अटक करण्यात यावी.आयोगाच्या अध्यक्षारेणू भाटीया यांनी गरज पडल्यास बादशाहचा पासपोर्ट जप्त करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

‘टटीरी’ गाण्यावरून देशभरात टीका झाल्यानंतर बादशाहने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत माफी मागितली होती. आपण प्राऊड हरियाणवी असल्याचे सांगत आपला हेतू कधीही महिलांबद्दल किंवा मुलांबद्दल आक्षेपार्ह बोलण्याचा नव्हता, असे त्याने स्पष्ट केले होते.