Siddharth Jadhav On The Great Indian Kapil Show: 'द ग्रेट इंडियन कपिल शो' (The Great Indian Kapil Show) हा लोकप्रिय कॉमेडी आणि सेलिब्रिटी चॅट शो असून त्याचं सूत्रसंचालन कपिल शर्मा करतो. या शोमध्ये बॉलिवूड, क्रीडा, संगीत आणि इतर विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटी पाहुणे म्हणून येतात. त्यानंतर कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि त्याची टीम खास विनोदी शैलीत त्या पाहुण्यांचं स्वागत करते आणि त्यांच्याशी हसत-खेळत संवाद साधते. कपिलच्या या शोमध्ये मजेशीर किस्से, विनोदी स्किट्स आणि कलाकारांमधील धमाल केमिस्ट्री पाहायला मिळते. या कार्यक्रमात सुनील ग्रोव्हर (Sunil Grover), कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek), कीकू शारदा (Kiku Sharda), राजीव ठाकूर (Rajiv Thakur) आणि अर्चना पूरन सिंह (Archana Puran Singh) यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकतात. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा पूर्वीच्या The Kapil Sharma Show या लोकप्रिय कार्यक्रमाचा नवा अंदाज आहे.
काही दिवसांपूर्वी 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये 'गांधी टॉक्स' (Gandhi Talks) या सिनेमाची टीम आली होती. त्यावेळी ए. आर. रहमान, विजय सेतुपती,अदिती राव हैदरी आणि मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) उपस्थित होते. शोमध्ये अनेक पंच, मजेशीर स्किट्स सुरू होते. त्यातच अदिती राव हैदरीच्या सौंदर्यावरही अनेक पॉझिटिव्ह विनोद करण्यात आले. शो पुढे जात असतानाच मध्ये एक स्किट येतं, त्यात कपिल शर्माच्या टीममध्ये असलेला कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा मुलींच्या वेशात स्टेजवर येतात आणि पाहुण्यांशी संवाद साधत वेगवेगळे पंच मारतात. याचवेळी एक संभाषण सिद्धार्थ जाधवपर्यंत येतं आणि त्यावेळी क्षणार्धात सिद्धार्थ जे उत्तर देतो, ते ऐकून थक्क व्हायला होतं. ही क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'कपिल शर्मा शोम'ध्ये नेमकं संभाषण काय झालं?
कृष्णा अभिषेक रडत रडत अदिती राव हैदरीला म्हणतो : तुमचं लग्न झालं ना?
किकू शारदा : मग काय झालं, तू एवढं का रडतोयस?
कृष्णा अभिषेक म्हणाला की, मी त्याच्यासाठी रडतेय, तो-तो अदितीच्या बाजूला बसलाय ना तो... सिद्धार्थसाठी...
सिद्धार्थ जाधव खळखळून हसतो आणि विचारतो का?
कृष्णा अभिषेक म्हणतो : अदितीच्या नवऱ्याचं नावंही सिद्धार्थ आहे ना, त्यामुळे तो हा विचार करतोय की, काश तो सिद्धार्थ मी असतो... आणि अदिती माझी झाली असती...
सिद्धार्थ जाधव एका क्षणाचाही विलंब न लावता म्हणतो की, माझी बायकोसुद्धा अदिती राव हैदरीसारखीच सुंदर आहे... तिच्यापेक्षाही चांगलीच आहे यार, असं काय...
सिद्धार्थ जाधव यानं 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये दिलेल्या एका उत्तराने अनेकांची मनं जिंकली. अभिनेत्री अदिती राव हैदरी हिच्याविषयी मजेशीर चर्चा सुरू असताना सिद्धार्थनं अत्यंत सहजपणे आपल्या पत्नीचं कौतुक करत, "माझी बायकोसुद्धा अदितीसारखीच सुंदर आहे... तिच्यापेक्षाही चांगली आहे...", असं म्हटलं. सिद्धार्थच्या या वक्तव्यानं त्याच्या मनात असलेला पत्नीबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान स्पष्टपणे दिसून आला. ग्लॅमरच्या दुनियेत अनेकदा इतर अभिनेत्रींच्या सौंदर्याची चर्चा होत असताना सिद्धार्थ जाधवनं स्वतःच्या पत्नीचं भरभरून कौतुक केल्यानं सोशल मीडियावरही त्याचं कौतुक होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
