Siddharth Chandekar: सध्या जग जितकं डिजिटल होत चाललं आहे तितक्यात लोकांसोबत होणाऱ्या ऑनलाइन फ्रॉडच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. मोबाईल कॉल, मेसेज किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना फसवण्याचे प्रकार समोर येत आहेत. सरकारकडूनही वेळोवेळी नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला जातो. तरीदेखील काहीजण या फसवणुकीला बळी पडतात, तर काहीजण वेळेवर सतर्क होत समोरच्यालाच चकमा देतात.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर बाबतीतही नुकताच असाच एक प्रकार घडला. सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत हा अनुभव सांगितला आहे. त्याला महानगर गॅसच्या नावाने एक फ्रॉड कॉल आला होता. कॉल करणारी व्यक्ती त्याच्याकडून काही माहिती घेण्याचा प्रयत्न करत होती. मात्र सिद्धार्थला सुरुवातीपासूनच संशय आला आणि त्याने उलट त्या व्यक्तीचीच शाळा घेतली. या संदर्भातील एक व्हिडिओ सिद्धार्थने शेअर केलाय. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनाही हसू आवरलेलं नाही. 

नेमकं म्हणाला काय सिद्धार्थ?

सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये फोनवरील संभाषण ऐकू येतं. कॉल करणारी व्यक्ती त्याला सांगत असते की आमच्या इथे मराठी बोलणारे कोणी नाही. यावर सिद्धार्थ लगेच म्हणतो, “महानगर गॅस... जो महाराष्ट्राचा गॅस आहे, तिथे मराठी चालत नाही?” त्यानंतर तो समोरच्याला म्हणतो, “तू माझ्यासाठी एक काम कर... कोणतंही एक मराठी वाक्य बोल. मग मी तुला लगेच मेसेज करतो.”

 

यावर समोरील व्यक्ती सांगते की त्याला मराठी येत नाही. तेव्हा सिद्धार्थ त्याला म्हणतो, “मी तुला मदत करतो. मी जे बोलेन ते तू बोलून दाखव.” त्यानंतर सिद्धार्थने मुद्दाम त्याला त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटातील गाजलेल्या ‘स्वर्गात आकाशगंगा’ या गाण्याच्या ओळी म्हणायला सांगितल्या. हा मजेशीर प्रकार पाहून नेटकऱ्यांनाही हसू आवरले नाही. अनेकांनी कमेंट करत सिद्धार्थच्या हुशारीचं कौतुक केलं आहे. अनेकांनी त्याला क्रांतीज्योतीची पोरं हुशार म्हणत कमेंट केल्या आहेत.