Shweta Shinde on Bold Scean With Prasad Oak: मराठमोळी अभिनेत्री श्वेता शिंदे (Shweta Shinde) सध्या चर्चेत आहे, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे. मराठी मनोरंजनसृष्टीत नेपोटिझम, ग्रुपीझम, अशा सगळ्या विषयांवर स्पष्टपणे तिने आपला प्रतिक्रिया दिल्या.अभिनेत्री श्वेता शिंदे आता मालिकांमध्ये फारशी दिसत नसली तरी अनेक मराठी मालिकांची ती निर्माती आहे. 'लागीरं झालं जी', 'देव माणूस', 'मिसेस मुख्यमंत्री', 'लाखात एक आमचा दादा' या तिच्या मालिका प्रचंड लोकप्रिय ठरल्या. शिवाय 'अवघाची संसार' मालिकेतली तिची नकारात्मक भूमिकाही चांगलीच रंगली. या मालिकेतील अभिनेता प्रसाद ओक आणि तिचे अनेक हॉट सीन्स दाखवण्यात आले होते. यावरही तिने मोकळेपणाने भाष्य केलं.
काय म्हणाली श्वेता शिंदे?
2012 मध्ये सुरू झालेल्या 'अवघाची संसार ' मालिकेत एखाद्या दोन पात्रांचे जवळीक होतानाचे संबंध दाखवणे हे TV वर पाहणं प्रेक्षकांसाठी नवं होतं. या काळात शूटिंग करताना प्रसाद ओकसोबत श्वेता शिंदे या दोघांचं रिलेशन कसं होतं यावर श्वेतानं मोकळेपणाने उत्तर दिलं. भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टवर ती म्हणाली ' प्रसाद आणि माझे एवढे हॉट सीन्स त्यावेळी मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच प्रेक्षकांना दिसत होते. पण मला याचा श्रेय दोन पुरुषांना द्यावसं वाटतं. एक प्रसाद ओक आणि दुसरा मंदार देवस्थळी. कारण तो दिग्दर्शक होता आणि प्रसाद अभिनेता होता . मला वाटतं ही दोन माणसं जोपर्यंत कम्फर्टेबल करत नाहीत. तोपर्यंत तसेच सीन्स होणे नाही.
एवढासा कोपरा, त्यात बोल्ड सीन...
'माझ्यासाठी आणि प्रसादसाठी प्रचंड आव्हान असायचं. एवढीशी जागा आहे. त्यात असंच उभं राहायचं आहे. मला आठवतंय, एक एवढासाच कोपरा होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला उभे राहायचं होतं. जागाच नव्हती. काय करायचं? आम्ही आपापसात ठरवायचो कसं उभं रहायचं, काय करायचं. सगळा स्ट्रगल असायचा. लोकांना असं वाटायचं काय करतायत हे, काय चालू असेल यांच्यामध्ये. त्यांनाही माहित नाही की आमचा इकडे काय स्ट्रगल चाललेला आहे. असं खूपदा होतं. "
आईला सीन्स बघून यायचं डिप्रेशन
ती पुढे म्हणाली ' माझ्या आईला तर डिप्रेशन यायचं माझे तसले सीन पाहून. आता लोकांना काय वाटेल. तिचं लग्न कसं होईल ? आईला खूप ताण यायचा. ती म्हणायची मला बघवत नाहीये. तू नको करूस असलं , असं सगळं माझ्या आईचं होतं. आम्ही ते सीन्स खूप एन्जॉय केले. छान पद्धतीने केले. या सगळ्याचं क्रेडिट आज या दोन पुरुषांना जाते. ब्लाउज आणि प्लेन साड्यांचे फॅशन मी तेव्हा सुरू केली होती. "असं श्वेता म्हणाली.
