Shreyas Talpade Upcoming Movie Mardini: अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) गाजलेल्या 'पुष्पा'ला (Pushpa) हिंदीत आवाज देणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे, श्रेयस तळपदे (Shreyas Talpade).  आपल्या अभिनयासोबतच आपल्या क्लासी लूकमुळे चर्चेत असलेला अभिनेता आजही अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहेत. आता श्रेयस तळपदे आपल्या नव्याकोऱ्या सिनेमासह भेटीला येत आहे. श्रे‌यस तळपदे (Shreyas Talpade) आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. 'मर्दिनी' सिनेमा घेऊन येणार आहे. 

'मर्दिनी' सिनेमाची कथा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याला, तिच्या सहनशीलतेला आणि तिच्या अदम्य धैर्याला उजाळा देणारी आहे. काळ कितीही बदलला, असुरांचं कितीही सावट पसरलं, तरीही इतिहासानं वेळोवेळी दाखवून दिलंय की, एका मर्दिनीचं धैर्य, तिची जिद्द आणि तिचा प्रखर संकल्प हाच अन्याय, दुष्टता आणि अंधार यांवर मात करण्यासाठी पुरेसा ठरतो.

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाची नांदी संपन्न झाली. हा चित्रपट प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या सुप्त शक्तीचं दर्शन घडवणार आहे. "असू देत लाख महिषासुर... पुरे आहे फक्त एक 'मर्दिनी' या संकल्पनेवर आधारित असलेला हा चित्रपट समाजातील वाईटाच्या विरोधात उभारा घेणाऱ्या एका सामान्य स्त्रीच्या अलौकिक शौर्याची गोष्ट सांगेल. 

आपल्या आगामी सिनेमाबाबत बोलताना निर्माता श्रेयस तळपदे म्हणाला की, "प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळं देण्याची परंपरा ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स ने कायम ठेवली आहे. पोस्टर बॉईज, बाजी आणि सनई चौघडे यांसारख्या अनेक चित्रपटांमधून मिळालेलं प्रेक्षकांचं अपार प्रेम या बॅनरच्या नावाला अधिकच उजाळा देतं. गुणवंतांना सदैव प्राधान्य देणाऱ्या या बॅनरने सई ताम्हणकर, तृप्ती डिंमरी, अनिता दाते यांसारख्या अनेक कलाकारांना तसेच कॅमेरामॅन आणि दिग्दर्शकांना प्रकाशझोतात आणलं आहे. आता ‘मर्दिनी’ या सिनेमाच्या निमित्ताने अजय मयेकर दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. हा त्यांचा पहिला दिग्दर्शकीय चित्रपट ठरणार असून लवकरच या चित्रपटाचं भव्य चित्रिकरण सुरु होणार आहे. 'मर्दिनी' हा केवळ एक चित्रपट नसून प्रत्येक स्त्रीमध्ये दडलेल्या अंतर्गत शक्तीला साजरा करणारा एक उत्सव आहे. आशा आहे कि या सिनेमाला सुद्धा प्रेक्षक प्रेम देतील."

दरम्यान, चित्रपटाबद्दलची संपूर्ण माहिती, कलाकारांची निवड आणि इतर तपशील लवकरच जाहीर केले जातील. श्रे‌यस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. ची भव्य निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या 2026 साली प्रेक्षकांच्या भेटीस मोठ्या पडद्यावर येत आहे.